गोवा प्रदेश काँग्रेस समितीची मागणी
प्रतिनिधी /पणजी
म्हादईच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी एक दिवसाचे विशेष विधानसभा अधिवेशन घेण्याची आणि श्वेतपत्रिका सादर करण्याची मागणी गोवा प्रदेश काँग्रेस समितीच्या बैठकीतून करण्यात आली आहे. तसेच म्हादईशी संबंधित सर्व प्रकारची आतापर्यंतची कागदपत्रे व इतर साहित्य सर्व आमदार, जिल्हा पंचायती, पंचायती, नगरपालिकांचे प्रतिनिधी अशा सर्वांना देण्यात यावे, अशी सूचना गोवा प्रदेश काँग्रेस समितीने केली आहे.
कर्नाटक सरकारच्या प्रकल्प अहवालांना केंद्र सरकारची मान्यता मिळाल्यानंतर गोव्यात त्यावर तीव्र पडसाद उमटत असून या प्रकरणी चर्चा करण्यासाठी गोवा प्रदेश काँग्रेस समितीची तातडीने बैठक घेण्यात आली.
केंद्र सरकारने राजकीय लाभासाठी म्हादईचा बळी देऊन गोवा सरकारची फसवणूक केल्याची टीका बैठकीत झाली. तसेच या प्रकरणी केंद्र सरकारचा बैठकीतून निषेध नोंदवण्यात आला. केंद्र सरकारने म्हादईच्या विषयावर पक्षपाती धोरण आखले असून कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवून म्हादई विकल्याची टीका बैठकीतून करण्यात आली.
म्हादईच्या प्रश्नावर गोव्यात जनजागृती करण्याचे पक्षाने ठरविले असून भाजपने गोव्याला कसे फसविले ? याची माहिती जागृती अभियानातून देण्यात येणार आहे. गोव्याचे संपूर्ण जीवन म्हादईवर अवलंबून आहे. म्हादईसाठी लढणारे सर्व गट संस्था, संघटना, कार्यकर्ते व चळवळींना काँग्रेस पक्ष पाठिंबा देणार असून सहकार्य करणार आहे. त्याशिवाय म्हादई टिकवण्यासाठी आवश्यक ती सर्व पाऊले काँग्रेस पक्षातर्फे उचलण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. केंद्र सरकारने गोवा राज्यावर मोठा अन्याय केला असून तो काँग्रेस पक्ष खपवून घेणार नाही तसेच या प्रकरणी जनतेला घेऊन आंदोलन करण्याचा इशारा गोवा प्रदेश काँग्रेस समितीच्या बैठकीतून देण्यात आला आहे.









