ऑनलाईन टीम / मुंबई :
दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणातल्या ड्रग्ज कनेक्शनमुळे अटकेत असलेली अभिनेत्री रिया चक्रवर्तीने मुंबई उच्च न्यायालयात जामीन याचिका दाखल केली होती. या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात आज न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या समोर प्राथमिक सुनावणी होणार होती. मात्र, कालपासून मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आज उच्च न्यायालय बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे आज ही सुनावणी रद्द करण्यात आली आता पुढील सुनावणी उद्या होणार आहे.
रियाचे वकील सतीश माने शिंदे म्हणाले की, शहरात पडत असलेल्या पावसामुळे सर्व भागात पाणी साचले आहे. त्यामुळे शहरात गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी आज कोर्टासाठी सुट्टी जाहीर केली असून या प्रकरणीची सुनावणी आता उद्या होणार आहे.
दरम्यान, रियाच्या अडचणींमध्ये अधिक वाढ होताना दिसत आहे. मंगळवारी मुंबई विशेष न्यायालयाने रियाच्या न्यायालयीन कोठडीत 6 ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे. या प्रकरणी रिया दोषी आढळल्यास तिला 10 वर्षांची शिक्षा होऊ शकते.