भारतातील वर्तमानपत्रात आलेली बातमी वाचून आटपाट नगरातल्या लोकांनीही विद्यापीठात ज्योतिष विभाग सुरू केला. मग झालं ते असं…
ठीक आठ वाजून पंधरा मिनिटे तेवीस सेकंदांनी विद्यापीठाच्या विभागासमोर उभ्या असलेल्या गाडय़ांच्या उजव्या दरवाजांमधून मान्यवरांनी आपापले उजवे पाय बाहेर काढून भूमीवर टेकवले. शिपायाने विभागप्रमुखांच्या हातून किल्ली घेतली आणि आठ-सोळा-अठ्ठावन्न वाजता कुलपात घालून फिरवून दार उघडले. सर्व मान्यवरांनी आपापल्या दालनात प्रवेश केला आणि नियोजित मुहूर्तावर खुर्चीत तशरिफ टेकवून पुढच्या मुहूर्तावर संगणक चालू केले.
शुल्क संकलन दालनात दीडशे पावत्यांचे तपशील आधीच टाईप करून झाले होते. आज किती विद्यार्थी प्रवेश घ्यायला येतील, तीन वर्षांनी त्यातले किती जण अंतिम परीक्षेत उत्तीर्ण होतील याची उत्तरे कालच प्रश्न कुंडली मांडून काढण्यात आली होती. त्यानुसार दीडशे पावत्या आणि पन्नास पदवी प्रमाणपत्रे टाईप करून तयार होती.
दहा वाजता विद्यार्थ्यांसाठी शुल्क संकलन दालनात प्रवेश सुरू झाले. अन्यत्र मेटल डिटेक्टर असतो तसा इथे ग्रहबळ डिटेक्टर लावला होता. विद्यार्थ्याने जन्मतारखेचा दाखला दिला की तो स्कॅनरमध्ये टाकून लगेच त्याची शैक्षणिक कुंडली तयार होऊन त्याने दालनात किती वाजता पाऊल टाकावे ही सूचना येई. त्यानुसार विद्यार्थी आत गेला आणि त्याने पैसे भरले की त्याच्या कुंडलीची माहिती दुसऱया संगणकावर अपलोड केली जात होती. तो विद्यार्थी अंतिम परीक्षेत उत्तीर्ण होईल की नाही याचे भाकित काही सेकंदात संगणक सांगत होता. तीन वर्षांनी उत्तीर्ण होणाऱया विद्यार्थ्यांचे पदवी प्रमाणपत्र (तीन वर्षांनंतरची तारीख टाकलेले) लगेच छापले जात होते.
आटपाट नगरातील प्रथेनुसार त्याचवेळी आकाशमार्गातून भगवान शंकर आणि पार्वती जात होते. आज नगरात काय गोंधळ चाललाय म्हणून कुतूहलाने ते खाली उतरले. डोळे मिटून स्वस्थ उभे राहिले. आटपाट नगरातील लोकांचे हे उद्योग पाहून भगवान शंकर प्रुद्ध झाले. आत्ताच तिसरा डोळा उघडून या मूर्खांना भस्मसात करतो म्हणू लागले. तेव्हा पार्वतीने त्यांची समजूत काढली, “मूर्ख असली तरी आपलीच लेकरं आहेत. आपण त्यांच्यावर रागावू नये. मी बुद्धिदात्या गणपतीला पृथ्वीवर पाठवते. तो त्यांना सद्बुद्धी देईल आणि मग ते हा मूर्खपणा थांबवतील.’’ भगवान शंकरांचा राग शांत झाला. गणपतीला निरोप पाठवून त्यांनी कैलास पर्वताकडे प्रयाण केले.








