सार्वजनिक मंडळांचा गणपती उत्साहात मंडपात दाखल : पर्यावरणपूरक उत्सवावर भर
प्रतिनिधी / सांगली
यंदा कोरोना व महापुराचे संकट असतानाही गणेशात्सव सणाला उत्साहात सुरुवात झाली. सकाळपासून भाविकांनी घरोघरी गणराय थाटात विराजमान केले. अनेकांनी गणरायास गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला घरी नेले, तर काहींनी आज. शुक्रवारी सकाळी सहकुटूंब गणेशमूर्ती आणून भक्तीभावाने प्रतिष्ठापना केली. तर काठी सार्वजनिक मंडळांचे गणराय मोरयाच्या गजरात रात्री उशीरापर्यंत मंडपात विराजमान झाले.
गणरायाच्या आगमनामुळे बाजारपेठेतील खरेदीची लगबग वाढली असून, अवघे शहर ‘बाप्पा’मय झाले आहे. शहरातील बाजारपेठेतील मारुती रोड, बालाजी चौक आदी परिसरात बाप्पांच्या मूर्तीचे स्टॉलवर गर्दी होती. सकाळी घरगुती, तसेच काही छोट्या मंडळांच्या कार्यकर्त्यांनी उत्साहात मूर्ती प्रतिष्ठापना केली. तर दुपारनंतर मोठमोठ्या सार्वजनिक मंडळांच्या मूर्ती उत्साहात नेण्यात आल्या. तसेच विश्रामबाग व आसपासच्या परिसरातील भाविकांच्या सोयीसाठी झालेल्या पुष्पराज चौक येथील गणेशमूर्तीच्या विविध स्टॉलवर मोठी गर्दी झाली होती.
काही सार्वजनिक मंडळांनी आपल्या लाडक्या बाप्पाला अगोदरच बुक करून ठेवले असल्याने शुक्रवारी कार्यकर्त्यांकडून गणरायाला मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात नेण्यात आले. अनेक मोठ्या मंडळांनी कोरोनामुळे यंदा भव्य दिव्य मुर्ती न आणता साध्या पद्धतीने दोन ते अडीच फुट इतक्या उंचीच्या गणरायाचीच प्रतिष्ठापना केली आहे. रात्री उशिरा काठी मंडळांनी गणरायाची प्रतिष्ठापना केली. यानिमित्ताने गुरुवार व शुक्रवारी बाजारपेठ शहर परिसर तसेच विश्रामबाग चौक, पुष्पराज चौक, सांगली-मिरज रोडवर भाविकांची मोठी गर्दी दिसून आली.
Previous Articleड्रोनद्वारे औषधांची डिलिव्हरी करणारे ‘हे’ ठरणार पहिले राज्य
Next Article जावलीत ४० जण तडीपार








