नवी दिल्ली
यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात आत्मनिर्भर बनण्यासाठी उद्योजकांना आवाहन करण्यात आले आहे. बजेटमध्ये काही उत्पादनांवर आयात कर वाढवण्यात आला असून ज्यामुळे या वस्तू महाग होणार आहेत. तर काही वस्तुंवरचा आयात कर कमी करण्यात आला आहे.
मोबाइल फोन स्वस्त तर आयात छत्री महाग

मोबाइल, फोन चार्जर, मोबाइल फोन कॅमेरा लेन्स, ट्रान्सफॉर्मरच्या देशांतर्गत निर्मितीला बळ देण्यात येणार असून यासाठीच यावरील अबकारी करात सवलतीची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे. मोबाइल, चार्जर हे स्वस्त होणार आहेत.
दुसरीकडे दागिने उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने कट आणि पॉलिशड डायमंडसह रत्नांवर कस्टम डय़ुटी 5 टक्के आकारली आहे. त्यामुळे हिरे, दागिने स्वस्त होणार आहेत. सरकारने छत्रीवरचे शुल्क 20 टक्के केले आहे. त्यामुळे आयात छत्र्या महागणार आहेत.
बजेटचा परिणाम अधिकतर वस्तुंवर नाही
अशा अनेक वस्तुंच्या किमतीवर बजेटचा परिणाम जाणवलेला नाही. कारण आज 90 टक्के वस्तुंच्या किंमती या जीएसटी करावर अवलंबून असतात. पण विदेशातून आयातीत वस्तुंवर आयात कर लावला जात असतो. तो कमी केला तर या वस्तु स्वस्त होतात, असे ते गणित असते. याचमुळे पेट्रोल, डिझेल, एलपीजी, सीएनजी आणि आयातीत वस्तू दारु, चामडे, सोने-चांदी, इलेक्ट्रॉनिक उत्पादने, मोबाइल, रसायन, गाडय़ा सारख्या वस्तुंच्या किंमतीवर बजेटमधील घोषणांचा परिणाम होत असतो.









