प्रतिनिधी / मडगाव
मोटरसायकलवरुन येऊन हातातील मोबाईल खेचून नेल्याच्या आरोपावरुन मायणा कुडतरी पोलिसानी तळेबांद -दवर्ली येथील इस्माईल उर्फ इस्माईल शेख या 25 वर्षीय आरोपीला अटक करुन त्याच्याकडून तीन मोबाईल, निळय़ा -काळय़ा रंगाची मोटरसायकल व हेल्मेट जप्त करण्यात आले आहे.
मायणा -कुडतरी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक शिवराम वायंगणकर यांनी या प्रकरणी सविस्तर माहिती दिली.
कामरशेत -कुडतरी येथील वैशाली गुरव ही गृहिणी जात असताना या आरोपीने तिच्या हातातील अंदाजे 11 हजार रुपये किंमतीचा मोबाईल खेचून नेला होता. ही घटना 4 ऑगस्ट 2021 रोजी सायंकाळी उशिरा 7 वाजण्याच्या सुमाराला घडली होती.
सदर महिला आपल्या पतीसमवेत कामावरुन परतत असताना कुडतरी -मुगाळी या रस्त्यावर ही घटना घडली होती. या घटनेची खबर वरील पोलिसांना कळताच त्यानी तपास सुरु केला. तपासात यश आले. पोलिसानी तळेबांद -दवर्ली येथील इस्माईल उर्फ इस्माईल शेख या 25 वर्षीय आरोपीला अटक करुन त्याच्याकडून एकूण तीन वेगवेगळय़ा कंपनीचे तीन वेगवेगळे मोबाईल जप्त केले. हे मोबाईल चोरीचे होते.
चोरी करताना जी मोटरसायकल वापरण्यात आली होती ती मोटरसायकलही पोलिसांनी जप्त केली. डोक्यावर हेल्मेट घालून मोटरसायकलवरुन जाऊन आरोपी मोबाईलची चोरी करीत होता अशी पोलिसांनी माहिती दिली.