प्रतिनिधी/ पणजी
मोप विमानतळाचे काम गेले वर्षभर विविध कारणामुळे बंद राहील्याने त्याच्या नियोजित पुर्णतेची तारीख पुढे जाणार असून आता सरकार नवीन तारीख निश्चित करणार आहे. तसेच बांधकाम करणाऱया जीएमआर इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड या कंपनीला जादा मुदत देण्यात येणार आहे.
सरकारी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्या कंपनीस मोप विमानतळाचे बांधकाम तीन वर्षाने पूर्ण करण्याची अट घालण्यात आली आहे. तसा करारही करण्यात आला आहे. आता त्या तीन वर्षातील एक वर्ष असेच कामाविना वाया गेल्याने त्या प्रकल्पाच्या बांधकाम पूर्णतेची तारीख एका वर्षाने तरी पुढे जाणार आहे.
विमानतळाचे बांधकाम साधारणपणे ऑक्टोबर 2018 मध्ये सुरू झाले होते व एकूण 14 टक्केच काम झालेले असताना न्यायालयाच्या स्थगितीमुळे काम बंद करावे लागले. त्यानंतर आता सुमारे एक वर्षाने ती स्थगिती उठवल्याने बांधकामाचा मार्ग मोकळा झाला असला तरी 2019 हे वर्ष बांधकामाशिवाय असेच फुकट गेले. कंपनी तेथे काहीच काम करू शकली नाही. 2021 च्या अखेरपर्यंत बांधकाम पूर्णतेची तारीख होती ती आता स्वाभाविकपणे पुढे जाणार असून एकंदरीत कामाचा आढावा घेवून सरकार आता नवीन पूर्णतेची तारीखी लवकरच ठरवणार आहे. बांधकामाचा कालावधी वाढवला तरी खर्च मात्र वाढणार नसल्याचे सांगण्यात आले.









