आम आदमी पक्षावर संशय ः 6 जणांना अटक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात पोस्टर्स लावण्यात आल्याप्रकरणी पोलिसांनी 36 एफआयआर नोंदविले आहेत. प्रिंटिंग प्रेस ऍक्ट आणि प्रॉपर्टी डिफेसमेंट ऍक्ट अंतर्गत दिल्ली पोलिसांनी हे गुन्हे नोंद केले आहेत. तर आम आदमी पक्षाच्या कार्यालयातून बाहेर पडलेल्या एका व्हॅनमधून पोस्टर्स जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी 6 जणांना अटक करण्यात आली आहे.
दिल्लीच्या काही भागांमध्ये ‘मोदी हटाओ, देश बचाओ’ अशाप्रकारच्या घोषणा असलेले पोस्टर्स चिकटविण्यात आले होते. या पोस्टर्सवर प्रिंटिंग प्रेसचा तपशील नमूद नव्हता. पोस्टर लावणाऱया एका इसमाला पोलिसांनी अटक केली होती. या आरोपीकडून पोस्टर्सचा गठ्ठा पोलिसांनी हस्तगत केला आहे.
आम आदमी पक्षाने पोलिसांच्या कारवाईला हुकुमशाही ठरविले आहे. मोदी सरकारची हुकुमशाही शिगेला पोहोचली आहे. पोस्टरमध्ये काहीच आक्षेपार्ह नसतानाही गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. भारत एक लोकशाहीवादी देश असल्याचा पंतप्रधान मोदींना विसर पडला असावा अशी उपरोधिक टीका आम आदमी पक्षाने केली आहे.
आम आदमी पक्ष पोस्टर प्रकरणी गुरुवारी निदर्शने करणार आहे. दिल्लीच्या जंतर-मंतर येथे होणाऱया या निदर्शनांमध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान सामील होणार आहेत.
दोन प्रिंटिंग प्रेस कंपन्यांना अशाप्रकारची प्रत्येकी 50 हजार पोस्टर्स छापण्याची ऑर्डर मिळाली होती. कंपन्यांनी निगडित कामगारांनी रविवारी रात्रीपासून सोमवार सकाळपर्यंत यातील अनेक पोस्टर्स शहराच्या विविध भागांमध्ये चिकटविली होती. प्रिंटिंग प्रेसचे नाव प्रकाशित न केल्याच्या आरोपाप्रकरणी संबंधित कंपन्यांच्या मालकांना अटक केली असल्याची माहिती विशेष पोलीस आयुक्त दीपेंद्र पाठक यांनी दिली आहे.









