ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय रिर्झव्ह बँकेच्या दोन नव्या योजना लाँच केल्या. आरबीआय रिटेल डायरेक्ट आणि रिझर्व्ह बँक इंटिग्रेटेड ओमबड्समन अशी या योजनांची नावे आहेत. या दोन्ही योजनांमुळे गुंतवणुकीची व्याप्ती वाढणार असून, त्याचा लहान-मोठय़ा व्यापाऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
पंतप्रधान मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या योजना लाँच केला. त्यानंतर देशवासियांना संबोधित करताना ते म्हणाले, आरबीआयच्या आज सुरू झालेल्या दोन्ही योजना देशातील गुंतवणुकीची व्याप्ती वाढवतील. त्यामुळे गुंतवणूकदारांना भांडवली बाजारात प्रवेश करणे अधिक सोपे होईल. डायरेक्ट स्कीममध्ये देशातील छोटय़ा गुंतवणूकदारांना सरकारी रोख्यांमध्ये गुंतवणूक करण्याचा सोपा आणि सुरक्षित मार्ग सापडला आहे.
इंटीग्रेटेड ओमबड्समन योजनेद्वारे ग्राहकांना वित्तीय संस्थांच्या मनमानीविरुद्ध आरबीआयकडे तक्रार करता येणार आहे. ग्राहकांना त्यांच्या तक्रारी एका पोर्टलवर एक ईमेल आयडी आणि एका पत्त्याद्वारे आरबीआयकडे नोंदवता येतील. तसेच एका टोल फ्री नंबरवर नागरिकांना आपल्या भाषेत तक्रारी नोंदवता येणार आहेत.