तरच महागाईचा भडका कमी होईल, पृथ्वीराज चव्हाण यांचा घणाघात
प्रतिनिधी/ कराड
देशात नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकांमधे भाजपाला मतदारांनी सपशेल नाकारत धूळ चारली आहे. भाजपाचा पराभव पंतप्रधान नरेंद्र मोदींना झटका देणारा आहे. या झटक्यामुळेच पेट्रोल फक्त पाच रूपयांनी कमी करण्याची बुद्धी मोदींना सुचली. यापुढे सर्वच पेट्रोल-डिझेलसह महागाईचा भस्मासूर कमी करायचा असेल तर मोदींना प्रत्येक निवडणुकात मतदारांनी पराभवाचा झटका द्यायला हवा असा घणाघात माजी मुख्यमंत्री आमदार पथ्वीराज चव्हाण यांनी केला.
वाढत्या महागाईविरोधात ‘भाजपा हटाव देश बचाव’ अशी घोषणाबाजी करत कराड तालुका कॉंग्रेस कमिटीच्यावतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचा समारोप कराड तहसील कार्यालयासमोर झाला यावेळी आमदार चव्हाण बोलत होते. जिल्हा प्रभारी श्रीरंग चव्हाण, कॉंग्रेसचे सरचिटणीस अजित पाटील-चिखलीकर, जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव, कराड तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, मलकापुरच्या नगराध्यक्षा निलम येडगे, जिल्हापरिषद सदस्य निवास थोरात, इंद्रजीत चव्हाण, राजेंद्र ऊर्फ आप्पा माने, मंगल गलांडे, धनश्री महाडीक, शंकरराव खबाले, मलकापुरचे बांधकाम सभापती राजेंद्र यादव, इंद्रजीत गुजर, माजी नगरसेवक श्रीकांत मुळे, माजी नगराध्यक्ष मोहनराव शिंगाडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
कोल्हापूर नाका येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चाला सुरूवात झाली. मोर्चाच्या पुढे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुरेश जाधव बैलगाडीत विराजमान होते. त्यानंतर कॉंग्रेसच्या महिला कार्यकर्त्या डोक्यावर तुळस घेऊन मोर्चात सहभागी होत्या. भाजपा सरकारचा निषेध असो, भाजपा हटाव देश बचाव अशी घोषणाबाजी करत मोर्चा शाहू चौक, दत्त चौक, बाजारपेठेतून बसस्थानक मार्गे पुन्हा दत्ता चौकात आला. छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चाचो तहसील कार्यालयासमोर सभेत रूपांतर झाले. प्रांताधिकारी उत्तम दिघे यांना कॉंग्रेसच्यावतीने महागाईविरोधात निवेदन देण्यात आले.
माजी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, मोदींचा प्रत्येक निर्णय सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल करत आहे. कोणाचाही सल्ला न घेता कसेही निर्णय घेण्याची पंतप्रधान मोदींची सवय आहे. या सवयीचा फटका सामान्य लोकांना बसत आहे. आज पेट्रोल-डिझेलसह इतर वस्तू महाग झाल्या आहेत.
फोटोवरून उडवली मोदींची खिल्ली
केंद्र सरकार याकडे लक्ष देत नाही. त्यांचे लक्ष फक्त जाहिरातबाजी करण्याकडे आहे. लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर फोटो लावून सरकारी खर्चाने जाहिरात करणारे जगातील एकमेव पंतप्रधान आहेत. काही लोक लस घ्यायला गेल्यावर त्यांना ऑनलाईन प्रमाणपत्र मिळते. त्यावरील फोटो पाहून ते लसीकरण केंद्रावर विचारणा करत आहेत की लस मी घेतली मग माझा फोटो का नाही. यांचा फोटो कसा? असे सांगत चव्हाण यांनी मोदींची खिल्ली उडवली.
जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव यांनी सातारा जिह्यातील प्रत्येक तालुक्यात आंदोलन करण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.
आभार मनोहर शिंदे यांनी मानले.
चुलीवर भाकरी करून निषेध
कॉंग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयासमोर इंधन दरवाढीचा निषेध करत चुलीवर भाकरी तयार केल्या. गॅस दर वाढल्याने आता चुलीवर स्वयंपाक करावा लागेल. पेट्रोल वाढल्याने सायकलवरून प्रवास करावा लागेल. जीवनावश्यक वस्तू महागल्याने एकवेळ जेवावे लागेल अशी परिस्थिती केंद्र सरकारमुळे येईल अशी भिती यावेळी व्यक्त करण्यात आली.









