बेरोजगारी, महागाईसह कोरोनासंबंधी निर्णयांवरून केले लक्ष्य
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्रातील मोदी सरकारला रविवारी सात वर्षे पूर्ण झाली आहेत, तर मोदींच्या दुसऱया कार्यकाळाला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. मोदी सरकारच्या या सात वर्षाच्या कामगिरीचा आढावा घेताना काँग्रेसने भाजपप्रणित मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. देशातील महागाई आणि कोरोना कार्यकाळातील कामगिरी लक्षात घेता हे गेल्या 73 वर्षांच्या इतिहासातील सर्वात दुर्बल सरकार असल्याचे काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटले आहे. तसेच मोदी सरकारने आपल्या कारकिर्दीत केवळ तिरस्कार पसरवला असाही आरोप त्यांनी केला.
देशाला एका हानिकारक आणि दुर्बल सरकारचे ओझे वाहताना आज सात वर्षे पूर्ण झाली आहेत. याचे परिणाम देशवासीय भोगत असून गेल्या सात वर्षांत बेरोजगारी 11.3 टक्क्मयांनी वाढली आहे. महागाईने आजपर्यंत सर्वोच्च पातळी ओलांडली आहे. अनेक भागात पेट्रोल 100 रुपयांवर गेले आहे तर खाद्यतेलाच्या किंमती 200 रुपयांवर गेल्या आहेत. त्यामुळे मोदी सरकार हे दुर्बल असल्याचे दिसत असल्याचे रणदीप सुरजेवाला म्हणाले.
देशातील कोरोनाच्या दुसऱया लाटेने धुमाकूळ घातला असताना याला जबाबदार केवळ मोदीच असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या काळात मोदींनी इतरांचे ऐकलं नाही. केवळ स्वार्थीपणामुळे देशाला सध्या कोरोनाच्या दुसऱया लाटेत मोठे नुकसान सहन करावे लागत आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे.









