प्रतिनिधी/ सातारा
जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी यांच्या आदेशाची पायमल्ली करून आपले दुकान सुरू ठेवल्या प्रकरणी बलशेठवार, आकाश उधानी, मोहित कटारिया, प्रवीण लाठी, मंगेश बलशेठवार यांच्यावर शाहूपुरी पोलिसांनी काल सायकांळी उशिरा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत शाहूपुरी पोलीस तपास करत आहेत.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सपोनि विशाल वायकर, पो.कॉ.यादव,भोसले, पो. ना. लैलेश फडतरे हे दि. 14 रोजी पो.कॉ. धनंजय कुंभार हे राजवाडा गोलबागपासून मोती चौकपर्यंत पायी पेट्रोलिंग करत होते. तेव्हा त्यांना 10.32 वाजता लोकमान्य टिळक स्टेशनरी हे दुकान उघडे दिसले. पोलिसांना पाहून तीन ग्राहक पळून गेले. त्यावेळी पोलिसांनी दुकान मालकास विचारले. त्यावेळी मी दुकान उघडले नाही असे उडवाउडवीचे उत्तर दिले. त्यास नाव विचारले असता त्याने बलशेठवार असे अपूर्ण नाव सांगितले. तसेच 10.59 वाजता पोलिसांना आनंद क्लॉथ सेंटर येथे गर्दी असल्याचे दिसले. पोलिसांनी दुकान मालकाचे नाव विचारले असता आकाश राजकुमार उधानी(वय 27, रा.शुक्रवार पेठ असे सांगितले. दुकानात ग्राहक मुमताज सिकंदर बागवान (रा.जाधव वाडा प्रतापगंज पेठ) या साहित्य खरेदी करताना आढळून आल्या. तसेच 11.09 वाजता सिटी सेंटर हे दुकान अर्धवट उघडे ठेवल्याचे पोलिसांना दिसले. विचारपूस केली असता मोहित शांतीलाल कटारिया असे सांगितले.
सर्व दुकानदारांनी पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. लग्नग्न सोहळ्यासाठी खरेदी करणारे ग्राहक राजेश पांडुरंग कदम (जगतापवाडी शाहूनगर), साईश शिवाजी काशीद (अमरलक्ष्मी कोडोली) हे मिळून आले आहेत. मेनका कापड दुकानातगर्दी असल्याचे पोलिसांना दिसले. दुकान मालक प्रवीण नंदकुमार लाठी (वय45, रा.भवानी पेठ) असे सांगितले. तेथे कापड खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांना पोलिसांनी विचारले असता रश्मी समीर शेख(शुक्रवार पेठ), युवराज कृष्णत कचरे(गोळीबार मैदान), वैशाली दिलीप शिंदे(पानमळेवाडी), प्रीतम प्रमोद जाधव(कोडोली) या चार ग्राहकांनी लहान मुलांची कपडे खरेदी करण्यासाठी आल्याचे पोलिसांना सांगितले. 11.45 वाजता पोलिसांना बलशेठवार स्टेशनरीचे दुकान उघडे दिसले. दुकानात ग्राहक इंदू दिलीप भोसले(वय 56, यादोगोपाळ पेठ) व त्यांची मुलगी असे पोलिसांच्या निदर्शनास आले. यावरून जिल्हाधिकारी व प्रांतधिकाऱयांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी बलशेठवार, आकाश उधानी, मोहित कटारिया, प्रवीण लाठी, मंगेश बलशेठवार यांच्यावर भा.द.वि.स.188,269नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.








