अचूक बातमी “तरुण भारत”ची, सोमवार, 23 ऑगस्ट 2021, स. 11.00
● रविवारी अहवालात 480 बाधित
● एकूण 11,632 जणांची तपासणी
● मास्क, सोशल डिस्टन्स आवश्यकच
● कोरोनाला सगळेच कंटाळलेत
● होमआयसोलेट रुग्णांनी बाहेर फिरू नये
सातारा / प्रतिनिधी :
जिल्हय़ात तीन अंकी संख्येने सुरु असलेली कोरोना बाधित वाढ थांबण्यासाठी अद्यापही नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. अनलॉक केल्याने सगळी जगरहाटी सुरु झाली असली तरी गर्दी न करणे, मास्कचा वापर, हाताची स्वच्छता या गोष्टी पुढील काही महिने तरी आवश्यकच आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा धोका टाळता येवू शकतो. दरम्यान, रविवारी रात्री आलेल्या अहवालात 480 जणांचा अहवाल बाधित आला असून, दोन महिन्यानंतर बाधित वाढ 500 च्या खाली आल्याचा मोठा दिलासा रविवारी रात्रीच्या अहवालाने जिल्हावासियांना दिलेला आहे.
रविवारी 480 जणांचा अहवाल बाधित
रविवारी रात्री प्रशासनाकडून आलेल्या अहवालानुसार एकूण 11,632 जणांची तपासणी करण्यात आल्यानंतर 480 जणांचा अहवाल बाधित आला आहे. यामध्ये प्रशासनाकडून आरटीपीसीआर चाचणीची पॉझिटिव्हीटी व रॅपिड अँटीजन टेस्टचा पॉझिटिव्हीटी दर नोंद करण्यात आलेला नाही. जिल्हयाचा एकूण पॉझिटिव्हीटी दर खाली घसरला असला तरी अद्याप बाधित वाढ थांबत नसल्याने नागरिक पॅनिक आहेत. यामध्ये रविवारच्या अहवालानेे मोठा दिलासा दिला असून तब्बल दीड ते दोन महिन्यांनी बाधित वाढ 500 च्या खाली घसरली आहे.
चार तालुक्यात तीन अंकी वाढ
सातारा, खटाव, कोरेगाव, फलटण या चार तालुक्यात तीन अंकी संख्येने बाधित वाढ असून हॉटस्पॉट कराड तालुका दोन अंकी संख्येवर आल्याचा दिलासा आहे. तर माण, वाई, खंडाळा, जावली या तालुक्यांमध्ये दोन अंकी वाढ असून महाबळेश्वर व पाटण तालुक्यात फक्त एक एक नवीन रुग्ण समोर आले असून या दोन्ही तालुक्यांमध्ये मंदावलेला वेग दिलासादायक आहे.
मास्क, सोशल डिस्टन्स आवश्यकच
जिल्हय़ात लोकसंख्येच्या निम्म्याच्यावर नागरिकांचे लसीकरण झाले आहे. शासनाकडून जशी लस उपलब्ध होईल असे लसीकरण सुरु असून, रविवारी त्याचा वेग मंदावला होता. मात्र, जरी लस घेतली असली तरी बाहेर पडताना नागरिकांनी आवश्यक कारण असेल तरच बाहेर पडावे तसेच बाहेर पडल्यानंतर देखील मास्क, हाताची स्वच्छता व सोशल डिस्टन्स या बाबी अद्याप पुढील काही महिने तरी पाळाव्याच लागणार आहेत. तिसऱया लाटेचा धोका कमी करायचा असेल तर ‘नियम पाळू, कोरोना टाळू’ यानुसारच वाटचाल करावी लागणार आहे.
कोरोनाला सगळेच कंटाळलेत
गेल्या दीड वर्षांपासून सुरु असलेला कोरोनाचा कहर काही महिने थांबला. तो संपला असे वाटत असताना पुन्हा दुसऱ्या लाटेने जिल्हय़ाला अक्षरश घायकुतीला आणले. त्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सामाजिक, आर्थिक परिणाम समाजावर झालेले आहेत व होतही आहेत. त्यामुळे कोरोनाला सगळेच कंटाळलेले आहेत. प्रशासनाकडून मात्र शक्यता गृहीत धरुन दररोज हजारोंच्या संख्येने टेस्टिंग सुरु आहे. त्यामुळे दैनंदिन सुरु असलेली बाधित वाढ व त्याचे खालीवर होणारे आकडे ही परिस्थिती संपणार तरी कधी, असे प्रत्येकाला वाटत आहे.
होमआयसोलेट रुग्णांनी काळजी घ्यावी
कोरोना टेस्टिंगनंतर काहींचा अहवाल बाधित येत आहे. त्यामध्ये शेकडो जणांना काहीच लक्षणे नसतात, काहींना सौम्य लक्षणे असतात. अशा रुग्णांना होम आयसोलेट केले जाते. ज्यांना घरी सुविधा नसतील त्यांना कोरोना केअर सेंटर रेफर केले जाते. मात्र, होम आयसोलेट असलेल्या रुग्णांनी त्यांचा कालावधी पूर्ण होईपर्यंत बाहेर जाणे टाळणे आवश्यक आहे. त्यामुळे जो स्प्रेड होतोय त्याने बाधित वाढ थांबत नसल्याचे आरोग्य विभागाचे मत आहे. त्यामुळे बाधित होम आयसोलेट रुग्णांनी स्प्रेड थोपवण्यासाठी काळजी घेण्याचे गरज आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे.
आकडेवारी घोळ रोखण्यासाठी शिस्त पाळा
जिल्हय़ात 105 हॉस्पिटल्समध्ये कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहे. यामध्ये शासकीय हॉस्पिटल्ससह खासगी हॉस्पिटलकडून मृत्यूची आकडेवारी अपलोड करण्यास विलंब होत असल्याने आकडेवारी फुगत आहे. त्यामुळे दैनंदिन आकडेवारी हॉस्पिटल्सनी करण्यासाठी स्वतःला शिस्त लावून घेण्याची गरज आहे. तर काही लॅब चालकांकडून देखील बाधितांची नोंद करण्यास विलंब होत होता आता तो होत नसला तरी लॅब चालकांवर प्रशासनाची यंत्रणा सातत्याने लक्ष देत आहे. त्यामुळे बाधितांची आकडेवारी पारदर्शक होत असली तरी मृत्यू संख्येची आकडेवारी देखील पारदर्शक होण्यासाठी शिस्त पाळण्याची गरज आहे.
रविवारपर्यंत जिल्हय़ात
एकूण नमूने 16,72,798
एकूण बाधित 2,34,687
एकूण कोरोनामुक्त 2,21,164
मृत्यू 5,803
उपचारार्थ रुग्ण 10,738
रविवारी जिल्हयात
बाधित 692
मुक्त 216
बळी 12