एपीएमसी रोडवरील घटना, आणखी दोघे जण जखमी
प्रतिनिधी/ बेळगाव
एपीएमसीजवळील राज्य राखीव दलाच्या प्रशिक्षण केंद्रानजीक मंगळवारी रात्री मोटारसायकल अपघातात जखमी झालेल्या अडत व्यापाऱयाचा बुधवारी मृत्यू झाला. या अपघातात आणखी दोघे जण जखमी झाले आहेत. वाहतूक उत्तर विभाग पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
सचिन हिरामणी बामणे (वय 40, रा. संगमेश्वरनगर) असे त्या दुर्दैवी युवकाचे नाव आहे. मार्केट यार्डमधील अडत व्यापारी हिरामणी बामणे यांचे ते चिरंजीव होत. मंगळवारी रात्री 7.30 वाजण्याच्या सुमारास दोन मोटारसायकलींची टक्कर होऊन अपघात झाला होता.
या अपघातात सचिनसह नंदू शंकर बिर्जे (वय 30) त्याचा मोठा भाऊ प्रवीण शंकर बिर्जे (वय 34, दोघेही रा. ब्रह्मनगर, उद्यमबाग) हे जखमी झाले होते. त्यांना खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. बुधवारी दुपारी उपचाराचा उपयोग न होता सचिनचा मृत्यू झाला. सचिन हा मार्केट यार्डमधील बामणे बंधू या फर्ममध्ये आपल्या वडिलांसमवेत गेल्या 15 वर्षांपासून व्यवसाय करत होता. अडत व्यावसायिकाच्या अपघाती मृत्यूने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.









