एकूण रक्कम चार हजार रु. : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतली गेली सतर्कता : उशिरापर्यंत रकमेवर कुणीही केला नाही दावा
वार्ताहर / वेंगुर्ले:
सध्या सर्वत्र कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन असताना वेंगुर्ले तालुक्मयातील मोचेमाड घाटरस्त्याच्या दुतर्फा काही नागरिकांना नोटा सापडल्यामुळे नेमके काय घडले असावे, याचीच चर्चा सुरू आहे. सापडलेल्या या रकमेबाबत मोठा गाजावाजा होऊनही या पैशांवर दावा करण्यासाठी सायंकाळी उशिरापर्यंत कुणीही पुढे आले नव्हते. ही एकूण रक्कम 3 हजार 730 रुपये होती.
वेंगुर्ले पोलीस निरीक्षक तानाजी मोरे यांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ देन पोलिसांना घटनास्थळी जाऊन त्या नोटांचा पंचनामा करा. नोटांना थेट हात न लावता सॅनिटायझर व हॅण्डग्लोव्हजचा वापर करून त्या नोटा सीलबंद करण्याच्या सूचना दिल्या. त्याप्रमाणे हेड कॉन्स्टेबल सचिन सावंत व प्रमोद काळसेकर यांनी पंचनामा करून त्या ताब्यात घेतल्या. त्या नोटा ज्याच्या असतील, त्यांनी त्याबाबतची ओळख पटवून त्या नेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
एक नोट मंदिराच्या फंडपेटीत
दरम्यान या मोचेमाड घाटीत सापडलेल्या काही नोटा पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. तर मार्निंग वॉकसाठी आलेल्या तीन मुलींना सापडलेली एक पाचशेची नोट बाधित असेल म्हणून त्यांनी उभादांडा कुर्लेवाडी येथील गणपती मंदिराच्या फंडपेटीत टाकल्याचेही निष्पन्न झाले. फंडपेटीतील त्या एका नोटीमुळे ती फंडपेटी सॅनिटाईज व क्वारंटाईन करण्याबाबत पोलिसांनी उभादांडा ग्रामसेवक अनंत जाधव यांना सांगितले.
नोटा पडल्या होत्या इतस्ततः
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उभादांडा येथील रहिवासी अनंत श्रीकृष्ण मोचेमाडकर हे सायंकाळी चार वाजता मोचेमाड घाटातून चालत जात असता 500 रुपये, 200 रुपये, 20 रुपये व 10 रुपयांच्या नोटा इतस्ततः पडलेल्या आढळून आल्या. त्यांनी या नोटांबाबत पोलीस पाटील विजय नार्वेकर यांच्याशी संपर्क साधला. याबाबत नार्वेकर यांनी वेंगुर्ले पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर हवालदार सचिन सावंत, पोलीस नाईक प्रमोद काळसेकर यांनी घटनास्थळी दाखल होत सॅनिटायझर, हॅन्डग्लोव्हज व चिमटा यांच्या साहय़ाने त्या नोटा ताब्यात घेत पंचनामा केला.
ग्रामस्थांनी दिली पोलिसांना माहिती
दरम्यान, याच दिवशी सकाळी उभादांडा-कुर्लेवाडी येथील तीन मुली मॉर्निंग वॉकसाठी जात असताना त्याच भागात त्यांना 500 रुपयांची नोट आढळून आली होती. त्यांनाही ती नोट बाधित वाटल्याने ती त्यांनी नजीकच्या गणपती मंदिरातील फंडपेटीत टाकली. तसेच याबाबतची माहिती त्यांनी आपल्या घरीही दिली होती. त्याची चर्चा स्थानिक ग्रामस्थांत झाली होती. काही ग्रामस्थांनी ही घटना पोलिसांच्या कानावर घातली. यावेळी पोलिसांनी मंदिरात जात याची माहिती स्थानिक देवस्थान समितीला दिली. त्यानुसार वेंगुर्ले नगर परिषदेच्यावतीने संपूर्ण मंदिर जंतुनाशक फवारणी करून धुण्यात आले. तर फंडपेटी सॅनिटाईज करून घेण्यात आली. त्या मुलींचीही वैद्यकिय तपासणी करण्यात आली.
कोरोनाच्या धर्तीवर ग्रामपंचायतीचे सचिव हे स्थानिक समितीवर असल्याने त्यांनी ती फंडपेटी सील करावी, अशी सूचना पोलिसांनी केली. मात्र मंदिरातील फंडपेटी कोणी सील करावी? याबाबत अजून कोणतीही कार्यवाही झाली नसल्याची माहिती मिळाली आहे.









