3 मे पर्यंत निर्बंध कायम : केंद्र सरकारचे पुन्हा स्पष्टीकरण : जीवनावश्यक वस्तू पुरविणाऱया दुकानांनाच सशर्त अनुमती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने आणि काही उद्योग-व्यवसाय वगळता देशाच्या कोणत्याही भागात सूट देण्यात आली नसल्याची स्पष्टोक्ती शनिवारी केंद्र सरकारच्यावतीने देण्यात आली. काही किराणा आणि अन्य दुकानांना सशर्त परवानगी दिली असली तरी मद्य-वाईन दुकाने, केश कर्तनालये (सलून) आणि मॉल्स यांच्यासाठी 3 मे पर्यंत ‘लॉकडाऊन’ शिथील करण्यात आलेले नाही असेही स्पष्ट करण्यात आले.
लॉकडाऊनमुळे लोकांच्या अडचणींमध्ये भर पडत असल्याने काही भागात मर्यादा शिथील करण्यात आल्याच्या अफवा सध्या सोशल मीडियावर पसरत आहेत. अशा अफवांमुळे काही भागांमध्ये लोक पुन्हा गर्दी करत असल्यामुळे कोरोना विषाणू संसर्गाचा धोका बळावू शकतो. त्यामुळे केंद्र सरकारच्या गृह विभागाने शुक्रवारी रात्री पुन्हा एकदा लॉकडाऊनबाबत भूमिका स्पष्ट केली. तरीही शनिवारपासून काही भागांमध्ये पुन्हा गर्दी दिसून आल्यामुळे गृह मंत्रालयाला स्वतंत्र प्रसिद्धीपत्रक काढून सर्वच सेवा-सुविधांबाबतची भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट करावी लागली. त्यानुसार काही राज्यांनी महसूल वाढविण्यासाठी दारू दुकाने चालू करण्याची मागणी केली होती. मात्र, देशात सर्वत्र मद्यविक्रीवरील बंदी कायम असेल असे केंद्रीय गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
मागील आठवडय़ात राज्यांकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर राज्य सरकारने काही महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केले होते. त्यानुसार मॉल्स किंवा मोठी दुकाने वगळता जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणाऱया इतरांना दुकाने सुरू ठेवण्याची सशर्त परवानगी दिली होती. मात्र, त्यासाठी जिल्हा प्रशासनाचे निर्देश पाळण्याच्या सूचनाही करण्यात आल्या होत्या. त्यानंतर शनिवारी पुन्हा गृह मंत्रालयाने स्पष्टीकरण देताना शहरी भागातील कॉम्प्लेक्स, निवासी भागातील दुकाने आणि निवासी संकुलांमध्ये असलेली दुकाने उघडण्यास परवानगी असल्याचे म्हटले आहे. मात्र, शॉपिंग मार्केट, मार्केट कॉम्प्लेक्स आणि शॉपिंग मॉल्सना परवानगी नसल्याचेही सांगितले.
दारू, वाईन, सलून्सना सवलत नाही
सर्व दुकानांना परवानगी दिली असतानाच दारू आणि वाईनशॉप सुरू करण्यास केंद्र सरकारने मनाई केली आहे. दारू किंवा तत्सम घटकांच्या विक्रीला पूर्णपणे बंदी आहे. तसेच केश कर्तनालयेही (सलून्स) बंद ठेवण्यात येणार आहेत. 3 मे पर्यंत हे निर्बंध कायम असतील. लॉकडाऊनदरम्यान कोरोना रोखण्यासाठी घातलेले निर्बंध या घटकांना लागूच राहतील, असे केंद्रीय गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
हॉटस्पॉट भागात सवलती नाहीत
देशातील मेट्रो शहरांसह काही जिल्हय़ांमध्ये कोरोनाचे जास्त रुग्ण आढळून आलेले आहेत. सदर भाग कोरोना हॉटस्पॉट किंवा कंटनमेंट झोन म्हणून जाहीर पेलेले आहेत. त्यामुळे अशा भागांमध्ये दुकाने सुरू करण्यासाठी कोणतीही सूट देण्यात आलेली नाही, असे स्पष्टीकरणही केंद्र सरकारकडून देण्यात आले आहे.









