माकडांमध्ये विषाणू रोखण्यासह कोरोना संसर्गही घटविला : जगभरात आतापर्यंत 1 कोटी 69 लाख 22 हजार 442 रुग्ण
जगभरात कोरोना विषाणूची बाधा आतापर्यंत 1,69,22,442 जणांना झाली आहे. यातील 1 कोटी 04 लाख 85 हजार 780 बाधितांना महामारीपासून मुक्तता मिळाली आहे. तर 6 लाख 64 हजार 172 बाधित दगावले आहेत. अमेरिकेच्या मॉडर्ना या जैवतंत्रज्ञान कंपनीच्या कोविड-19 लसीचा माकडांवर सकारात्मक प्रभाव दिसून आला आहे. या लसीने माकडांच्या नाक आणि फुफ्फुसांमधील संसर्ग रोखला आहे. लसीच्या वापरानंतर नाक अणि फुफ्फुसामध्ये विषाणूंची पैदास थांबली आहे. नाकात विषाणूंची संख्या न वाढल्याने त्याचा संसर्ग पसरू शकत नाही. ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या लसीची माकडांवर चाचणी झाली होती, तेव्हा देखील असे परिणाम दिसून आले नव्हते. या पार्श्वभूमीवर मॉडर्नाच्या लसीवरून अपेक्षा उंचावल्या आहेत.
चीन : 101 नवे रुग्ण

चीनमध्ये मागील 24 तासांमध्ये 101 नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. एप्रिलनंतरचे हे सर्वाधिक प्रमाण ठरल्याची माहिती नॅशनल हेल्थ कमिशनने दिली आहे. चीनमध्ये आतापर्यंत 83 हजार 959 रुग्ण सापडले आहेत. यातील 78 हजार 934 बाधित पूर्णपणे बरे झाले आहेत. तर 4,634 रुग्णांचा मृत्यू ओढवला आहे.
इस्रायलमध्ये संसर्ग गतिमान

इस्रायलमध्ये 24 तासांमध्ये 2,308 नवे रुग्ण सापडले आहेत. देशात पहिल्यांदाच एका दिवसात इतके रुग्ण आढळून आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. यापूर्वी 22 जुलै रोजी 2,043 बाधित सापडले हेते. देशातील बाधितांचा आकडा आता 66 हजार 293 वर पोहोचला असून 486 जणांना जीव गमवावा लागला आहे. तर 739 रुग्णांवर सद्यकाळात उपचार सुरू आहेत.
सौदी अरेबिया : हज यात्रा सुरू

सौदी अरेबियात बुधवारपासून हजला प्रारंभ झाला आहे. परंतु हजदरम्यान सोशल डिस्टन्सिंगची खबरदारी घेतली जात आहे. एकावेळी केवळ 20 जायरीनांना मक्कामध्ये येऊ दिले जात आहे. तेथे जाण्यापूर्वी सर्वांना एक दिवस आयसोलेशनमध्ये रहाणे अनिवार्य आहे. हजदरम्यान जायरीनांना मास्क परिधान करणेही सक्तीचे आहे. यंदा कुठल्याही विदेशी यात्रेकरूला येण्याची अनुमती सौदी अरेबियाकडून देण्यात आलेली नाही.
तुर्कस्तान : 963 नवे रुग्ण

तुर्कस्तानात मागील 24 तासांमध्ये 963 नवे बाधित सापडले आहेत. देशातील बाधितांचा एकूण आकडा आता 2 लाख 27 हजार 982 वर पोहोचला आहे. देशात आतापर्यंत 5,645 रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. देशात 46 लाख 65 हजार 383 लोकांची चाचणी करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री फहरेतिन कोका यांनी दिली आहे. तुर्कस्तानने 1 ऑगस्टपासून 4 देशांसोबत विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत, रशिया, कुवेत आणि दक्षिण आफ्रिकेकरता विमानोड्डाणे होणार आहेत.
इटली : टाळेबंदी वाढली

इटलीच्या सरकारने टाळेबंदीचा कालावधी 15 ऑक्टोबरपर्यंत वाढविला आहे. पंतप्रधान जुसेप कोंटे यांनी रुग्णसंख्या पाहता संसदेत निर्बंध वाढविण्याचा प्रस्ताव मांडला होता. संसदेच्या वरिष्ठ सभागृहात मंगळवारी चर्चा झाल्यावर या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. इटलीतील संसर्ग घटला असला तरीही अद्याप विशेष खबरदारी घेतली जात आहे. टाळेबंदी लागू असली तरीही बहुतांश व्यवहारांना अनुमती देण्यात आली आहे.
अन्य देशांना लस देऊ

कोरोना महामारीवरील लस तयार झाल्यावर अमेरिकेच्या प्रशासनाकडून त्याचा अन्य देशांना पुरवठा केला जाऊ शकतो. व्हेंटिलेटर आणि अन्य आवश्यक सामग्री अन्य देशांना पुरविली होती, त्याच धर्तीवर लसही पुरवू असे उद्गार अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काढले आहेत. चालू वर्षाच्या अखेरीस किंवा 2021 च्या प्रारंभी लस उपलब्ध होण्याची अमेरिकेला अपेक्षा आहे. मॉडर्ना कंपनीने लसीच्या तिसऱया टप्प्यातील चाचणी सुरू केली आहे.
कोरोना आता मौसमी संसर्ग नव्हे!

डब्ल्यूएचओच्या प्रवक्त्या हॅरिस यांचा इशारा : महामारीची लाट वाढतेय : खबरदारी घेणे आवश्यक
जागतिक आरोग्य संघटनेने आणखी एक इशारा दिला आहे. कोरोना महामारी आता मौसमी आजार नव्हे तर एक मोठी लाट आहे. लोक आतापर्यंत त्याला एक मौसमी आजार मानत आले आहेत. कोरोना नव्या प्रकारचा विषाणू आहे, तो इन्फ्लुएंजाप्रमाणे वर्तन करत नाही. नवा कोरोना वेगळय़ाप्रकारे संसर्ग पसरवित असल्याचे इशारावजा विधान जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रवक्त्या मार्गारेट हॅरिस यांनी केले आहे.
मोठय़ा प्रमाणावर गर्दी असलेल्या समारंभामध्ये हा संसर्ग जलदगतीने फैलावत असल्याने तो रोखण्यासह सतर्क होणे गरजेचे आहे. महामारी एक मोठी लाट होत चालली असून त्याचा आलेख वाढणार तसेच कमी होत राहणार आहे. अशा स्थितीत कोरोनाचा आलेख स्थिर करण्याचा प्रयत्न केला जावा, असे हॅरिस यांनी म्हटले आहे.
फ्ल्यूची लस घ्या

कोरोना विषाणू सर्वच ऋतूंमध्ये सक्रीय राहतो. दक्षिण गोलार्धात कोरोनासोबत मौसमी इन्फ्लुएंजाचे रुग्ण वाढणे केवळ योगायोग आहे. जागतिक आरोग्य संघटना स्थितीवर सातत्याने नजर ठेवून आहे. आतापर्यंत प्रयोगशाळेत पोहोचलेल्या नमुन्यांमध्ये फ्ल्यूची अधिक प्रकरणे दिसून आलेली नाहीत. परंतु एखाद्याला श्वसनाशी संबंधित कुठलाही आजार असल्यास संसर्ग झाल्यावर प्रकृती अधिकच नाजूक होऊ शकते. अशा स्थितीत लोकांनी फ्ल्यूची लस टोचून घ्यावी, असे आवाहन हॅरिस यांनी केले आहे.









