ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरा डावही गडगडला, दुसऱया दिवसअखेर 4 बाद 31 धावा, स्टार्क, बोलँडचे प्रत्येकी 2 बळी
मेलबर्न / वृत्तसंस्था
ऍशेस मालिकेतील तिसऱया कसोटी सामन्यात पाहुण्या इंग्लिश संघासमोर मैदानात आणि मैदानाबाहेरही अडचणींचा भला मोठा डोंगर उभा ठाकल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. एकीकडे, दुसऱया दिवसाच्या खेळासाठी मैदानात उतरण्यापूर्वीच इंग्लिश संघाच्या सहायक पथकातील चौघांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली तर दुसरीकडे, दिवसभर मैदानात इंग्लंडची सातत्याने दैना उडत गेली. ऑस्ट्रेलियाने आपल्या पहिल्या डावात सर्वबाद 267 धावा जमवल्यानंतर इंग्लंडची दुसऱया डावात दिवसअखेर 4 बाद 31 अशी दाणादाण उडाली. ऑस्ट्रेलियन संघ या लढतीत तूर्तास 51 धावांनी आघाडीवर आहे.
ऑस्ट्रेलियाने सोमवारी खेळाच्या दुसऱया दिवशी 1 बाद 61 या धावसंख्येवरुन डावाला पुढे सुरुवात केल्यानंतर 9 गडय़ांच्या बदल्यात आणखी 206 धावांची भर घातली. इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या 185 धावांमध्येच खुर्दा झाल्याने त्यांना डावाअखेर 82 धावांची आघाडी मिळाल्याचे स्पष्ट झाले. इंग्लिश सीमर जेम्स अँडरसनने 23 षटकात 33 धावात 4 बळी, असे पृथक्करण नोंदवले. मार्कस हॅरिस (76), वॉर्नर (38), स्टीव्ह स्मिथ (16) व कमिन्स (21) हे महत्त्वाचे फलंदाज त्याने बाद केले. ट्रव्हिस हेडने 27 तर मिशेल स्टार्कने नाबाद 24 व पॅट कमिन्सने 21 धावा जमवल्या. अँडरसनला ऑलि रॉबिन्सन (2-64), मार्क वूड (2-71), बेन स्टोक्स (1-47), जॅक लीच (1-46) यांनी समयोचित साथ दिली.
नंतर इंग्लंडच्या दुसऱया डावात सलामीवीर हसीब हमीदला 7 तर जॅक लीचला शून्यावर बाद करत पदार्पणवीर स्कॉट बोलँडने स्टेडियमवर उपस्थित 42626 चाहत्यांमध्ये खुशीची लहर आणली. स्टार्कने क्रॉली (5) व मलान (0) यांचे बळी घेत इंग्लंडला आणखी खाईत लोटले. बेन स्टोक्स व जो रुट हे अनुभवी फलंदाज क्रीझवर होते. मात्र, केवळ 12 षटकात 4 फलंदाज गमावले असल्याने इंग्लंडचा संघ अडचणीत आला.
ऑस्ट्रेलियाचा संघ 5 कसोटी सामन्यांच्या या मालिकेत सध्या 2-0 फरकाने आघाडीवर असून यामुळे इंग्लंडला ऍशेस राखण्यासाठी उर्वरित तिन्ही सामने जिंकावे लागतील, हे स्पष्ट आहे.
धावफलक
इंग्लंड पहिला डाव: सर्वबाद 185.
ऑस्ट्रेलिया पहिला डाव ः मार्कस हॅरिस झे. रुट, गो. अँडरसन 76 (189 चेंडूत 7 चौकार), डेव्हिड वॉर्नर झे. क्रॉली, गो. अँडरसन 38 (42 चेंडूत 5 चौकार), नॅथन लियॉन झे. बटलर, गो. रॉबिन्सन 10 (22 चेंडूत 2 चौकार), मार्नस लाबुशाने झे. रुट, गो. वूड 1 (14 चेंडू), स्टीव्ह स्मिथ त्रि. गो. अँडरसन 16 (31 चेंडूत 1 चौकार), ट्रव्हिस हेड झे. रुट, गो. रॉबिन्सन 27 (48 चेंडूत 2 चौकार), कॅमेरुन ग्रीन पायचीत गो. लीच 17 (63 चेंडूत 2 चौकार), ऍलेक्स कॅरे झे. बटलर, गो. स्टोक्स 19 (43 चेंडू), पॅट कमिन्स झे. हमीद, गो. अँडरसन 21 (32 चेंडूत 2 चौकार), मिशेल स्टार्क नाबाद 24 (37 चेंडूत 1 चौकार), स्कॉट बोलँड झे. क्रॉली, गो. वूड 6 (11 चेंडू). अवांतर 12. एकूण 87.5 षटकात सर्वबाद 267.
गडी बाद होण्याचा क्रम
1-57 (वॉर्नर, 14.1), 2-76 (लियॉन, 19.4), 3-84 (लाबुशाने, 24.3), 4-110 (स्मिथ, 35.1), 5-171 (हेड, 55.4), 6-180 (हॅरिस, 61.1), 7-207 (ग्रीन, 72.5), 8-219 (कॅरे, 75.3), 9-253 (कमिन्स, 84.2), 10-267 (बोलँड, 87.5).
गोलंदाजी
जेम्स अँडरसन 23-10-33-4, ऑलि रॉबिन्सन 19.2-4-64-2, मार्क वूड 19.5-2-71-2, बेन स्टोक्स 10.4-1-47-1, जॅक लीच 15-0-46-1.
इंग्लंड दुसरा डाव ः हसीब हमीद झे. कॅरे, गो. बोलँड 7 (31 चेंडूत 1 चौकार), झॅक क्रॉली झे. कॅरे, गो. स्टार्क 5 (16 चेंडूत 1 चौकार), डेव्हिड मलान पायचीत गो. स्टार्क 0 (1 चेंडू), जो रुट खेळत आहे 12 (20 चेंडूत 2 चौकार), जॅक लीच त्रि. गो. बोलँड 0 (2 चेंडू), बेन स्टोक्स खेळत आहे 2 (2 चेंडू). अवांतर 5. एकूण 12 षटकात 4 बाद 31.
गडी बाद होण्याचा क्रम
1-7 (क्रॉली, 4.4), 2-7 (मलान, 4.5), 3-22 (हमीद, 10.3), 4-22 (लीच, 10.5).
गोलंदाजी
मिशेल स्टार्क 5-2-11-2, पॅट कमिन्स 6-3-14-0, स्कॉट बोलँड 1-0-1-2.
इंग्लिश पथकातील चौघांना कोरोनाची बाधा
इंग्लंडच्या पथकात समाविष्ट असलेल्या सहायक पथकातील 2 सदस्य व त्यांच्या कुटुंबातील 2 सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचे सोमवारी सकाळी जाहीर केले गेले आणि यामुळे एकच खळबळ उडाली. याच कारणामुळे इंग्लंडचा संघ उशिराने एमसीजीवर आला आणि खेळाला 30 मिनिटे उशिराने सुरुवात झाली. कोरोनाग्रस्त चारही सदस्य सध्या आयसोलेशनमध्ये असल्याचे पत्रकातून नमूद करण्यात आले. यापूर्वी, ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सही एका कोरोनाग्रस्ताच्या थेट संपर्कात आल्याने दुसऱया कसोटी सामन्यात खेळू शकला नव्हता. कोरोनामुळेच 2020 च्या प्रारंभी इंग्लंडचे दक्षिण आफ्रिका व लंकन दौरेही रद्द करावे लागले होते.









