प्रतिनिधी /बेळगाव
कॅन्टोन्मेंट शाळेच्या आवारात टर्फ मैदान बनविण्यासाठी 25 वर्षांच्या अवधीकरिता विनामोबदला कराराने मैदान भाडेतत्त्वावर देण्यात आले आहे. भू-भाडे कायद्यानुसार 5 हून अधिक वर्षे भाडेकराराने देता येत नाही. याबाबत चर्चा करण्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डने बुधवार दि. 12 रोजी विशेष बैठक आयोजित केली असून याबाबत कॅन्टोन्मेंट बोर्ड कोणता निर्णय घेणार? याकडे कॅन्टोन्मेंटवासियांचे लक्ष लागले आहे.
कॅन्टोन्मेंट कार्यालयाशेजारी विविध माध्यमांच्या शाळा चालविण्यात येतात. शाळेत 1500 हून अधिक विद्यार्थी आहेत. विद्यार्थ्यांसाठी भव्य मैदान आहे. मात्र यापैकी निम्मे मैदान फुटबॉल टर्फ मैदान बनविण्यासाठी 25 वर्षांच्या कराराने भाडेतत्त्वावर दिले आहे. मात्र हे मैदान विनामोबदला देण्यात आले आहे. बांधा, वापरा आणि हस्तांतर करा, या तत्त्वावर कॅन्टोन्मेंटने 25 वर्षांचा करार केला आहे. सदर मैदान भाडेतत्त्वावर देण्यासाठी कॅन्टोन्मेंट बैठकीत मंजुरी देऊन टर्फ मैदान निर्माण करण्यात आले आहे. मात्र या ठरावाला पुणे येथील सदर्न कमांड कार्यालयातून मंजुरी मिळाली नाही. ठराव मंजुरीसाठी पाठविला असता, या भाडेकरारास प्रिंसिपल डायरेक्टरनी आक्षेप घेतला आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डच्या भू-भाडे कायद्यानुसार कोणतीही जमीन 5 वर्षांच्या कराराने भाडेतत्त्वावर देण्याची तरतूद आहे. त्याहून अधिक कालावधीकरिता भाडेकरार करता येत नाही, अशी सूचना प्रिंसिपल डायरेक्टरनी कॅन्टोन्मेंटला केली आहे. सदर ठराव दुरुस्त करावा व नवीन प्रस्ताव तयार करण्याची सूचना केली आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डने 25 वर्षांच्या भाडेकराराने केलेला करार रद्द करावा लागणार असून याकरिता विशेष बैठक आयोजित केली आहे. बुधवारी सकाळी 11 वाजता आयोजित केलेल्या बैठकीत टर्फ मैदानाच्या भाडेकराराबाबत निर्णय घेतला जाणार आहे. तसेच यावेळी घरपट्टी, वसुली व अन्य विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.









