मी 28 वर्षांची तरुणी असून माझी एकही जिवलग मैत्रीण नाही. मी मित्रमैत्रिणींसोबतचं नातं टिकवून ठेऊ शकत नसल्यामुळे ते मला सोडून जातात. मध्यंतरी माझ्या जिवलग मैत्रिणीने माझ्याशी संबंध तोडले. मी बरेचदा तिची माफी मागितली. पण आता ती माझ्याशी बोलायला किंवा मैत्री करायला तयार नाही. मी स्वार्थी असल्याचा तिचा समज झाला आहे. मुळात मी स्वार्थी नाही. त्यामुळे तिचा असा समज का झाला असावा, हे मला कळलेलं नाही. आता माझ्याकडे बोलायला, भावना व्यक्त करायला कोणीही उरलेलं नाही. त्यामुळे मला नैराश्य आलं आहे. माझ्यात काही कमतरता आहे की माझ्या आयुष्यात चांगली माणसं अजून आलेली नाहीत?
– इतर कोणत्याही नात्याप्रमाणे मैत्रीतही चढ-उतार असतात. मित्र-मैत्रिणींमध्ये भांडणं होतात, त्यांच्यात काही तरी बिनसतं. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या मित्रमैत्रिणींना समजून घेऊन वागलं पाहिजे. मला वाटतं, तू स्वतःवर आणि स्वयंविकासावर लक्ष केंद्रित करायला हवं. नातेसंबंधांशी संबंधित कार्यशाळा घेतल्या जातात. या कार्यशाळांमध्ये नातेसंबंध जपण्याबाबत मार्गदर्शन केलं जातं. तू अशा कार्यशाळांमध्ये सहभागी होऊ शकतेस. इथे तुला आपल्या व्यक्तिमत्त्वाचा उलगडा होईल. तू स्वतःलाच काही प्रश्न विचार. थोडं विचारमंथन कर. आपलं काय चुकतंय, याचं आकलन कर. तुलाच तुझ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. तू समुपदेशकांची मदत घेऊ शकतेस. तसंच स्वतःला गुंतवून घेण्याचा प्रयत्न कर.









