वृत्तसंस्था / इंफाळ
मणिपूरमधील मैतेयी समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देणाऱ्या तेथील उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले जाऊ शकणार आहे. या निर्णयामुळे या राज्यात गेले अनेक महिने हिंसाचार आणि दंगली घडल्याचा आरोप केला जात आहे. उच्च न्यायालयाचे न्या. अहंथेम बिमोल आणि न्या. गुणेश्वर शर्मा यांच्या खंडपीठाने या राज्यातील वनवासी समुदायांना उच्च न्यायालयाच्या या आदेशाविरोधात अपील करण्याची मुभा दिली आहे. या नव्या निर्णयामुळे राज्यात शांतता निर्माण होण्यास साहाय्य होणार आहे, असे अभ्यासकांचे मत आहे.









