वृत्तसंस्था/ बार्सिलोना
लायोनेल मेस्सी बार्सिलोना क्लब सोडणार असल्याची चर्चा बरीच रंगली होती. पण आता त्याने बुधवारपासून संघसहकाऱयांसमवेत सरावालाही सुरुवात केली आहे.
सोमवारी क्लबमध्ये आल्यापासून तो स्वतंत्रपणे सराव करीत होता. आपल्याला क्लब सोडण्याची इच्छा असल्याचे त्याने जाहीर केल्यापासून व नंतर कायदेशीर वाद टाळण्यासाठी क्लबमध्येच राहण्याचे ठरविल्यापासून तो संघात सामील झाला नव्हता. बार्सिलोनाचे नवे प्रशिक्षक रोनाल्ड कोमन यांच्या मार्गदर्शनाखाली संघाचा सराव सुरू होता. पण त्यात सामील होण्याआधी मेस्सीला दोनदा कोरोना चाचणी करावी लागली. त्यात पास झाल्यानंतर तो सरावासाठी संघात सामील झाला आहे. मेस्सीप्रमाणेच फिलिप कुटिन्होही संघात सामील झाला आहे. तो देखील स्वतंत्रपणे सराव करीत होता.









