वृत्तसंस्था /नवी दिल्ली
सहा वेळची वर्ल्ड चॅम्पियन एमसी मेरी कोम व आशियाई सुवर्णजेता मुष्टियोद्धा अमित पांघल यांना महिला व पुरुषांसाठी आयोजित 13 दिवसांच्या राष्ट्रीय शिबिरातून वगळण्यात आले आहे. सदर शिबिर 11 डिसेंबरपासून होत आहे.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱया पाचही पुरुष मुष्टियोद्धय़ांना या शिबिरातून डच्चू दिला जाणे आश्चर्याचे ठरले आहे. मनीष कौशिक, आशिष चौधरी, विकास कृष्णन यांचा 52 पुरुष मुष्टियोद्धय़ांच्या पथकात समावेश नाही. यापैकी विकास कृष्णन हा सध्या खांद्याच्या दुखापतीवर उपचार घेत आहे.
महिला गटातील राष्ट्रीय शिबिर देखील दि. 11 ते 24 डिसेंबर याच कालावधीत रोहतकमधील भारतीय क्रीडा प्राधिकरण केंद्रावर होईल. महिला गटात 49 मुष्टियोद्धय़ांचा समावेश असून त्यात प्राधान्याने टोकियो ऑलिम्पिक कांस्यजेती लोवलिना बोर्गोहेन (70 किलोग्रॅम), कनिष्ठ गटातील माजी वर्ल्ड चॅम्पियन निखत झरीन (52 किलोग्रॅम) व आशियाई चॅम्पियन पूजा रानी (81 किलोग्रॅम) यांचा समावेश आहे. बोर्गोहेनने नॅशनल्समध्ये भाग घेतला नव्हता. पण, टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले असल्याने या निकषावर तिला शिबिरात प्रवेश देण्यात आला.
‘सदर शिबिर फक्त राष्ट्रीय पदकजेत्यांसाठी असेल आणि नॅशनल्सनंतर चाचणीच्या माध्यमातून निवडी केल्या जातील, याची घोषणा यापूर्वीच केलेली होती’, असे स्पष्टीकरण संघटनेतील एका वरिष्ठ पदाधिकाऱयाने गोपनियतेच्या अटीवर दिले.









