वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताची अव्वल महिला मुष्टियोद्धी एम. सी. मेरी कोम हिने गेल्या वर्षी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी आपली पात्रता सिद्ध केल्यानंतर आता ती तब्बल अकरा महिन्यांच्या कालावधीने पुन्हा मुष्टियुद्ध रिंगणात पुनरागमन करीत आहे. त्याचप्रमाणे मनीष कौशिकचेही या क्षेत्रात तब्बल एक वर्षानंतर पुनर्प्रवेश होत आहे.
स्पेनमध्ये पुढील महिन्यात होणाऱया बॉक्सेम आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धेत मेरी कोम, मनीष कौशिकसह अन्य भारतीय मुष्टियोद्धे सहभागी होणार आहेत. सदर स्पर्धा स्पेनमधील कॅस्टेलन येथे 1 ते 7 मार्च दरम्यान घेतली जाणार असून या स्पर्धेत विविध देशांचे अव्वल स्पर्धक भाग घेणार आहेत. 37 वषीय मेरी कोमने या स्पर्धेसाठी गेल्या महिन्यापासून बेंगळूरमध्ये राष्ट्रीय सराव शिबिरात सराव केला आहे. या सराव शिबिरामध्ये राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्यपदक विजेता मनीष कौशिक, अमित पांघल यांनी भाग घेतला होता. 52 किलो गटात अमित पांघलने विश्व मुष्टियुद्ध स्पर्धेत रौप्यपदक तसेच जर्मनीत नुकत्याच झालेल्या कोलॉन येथील विश्वचषक मुष्टियुद्ध स्पर्धेत सुवर्णपदक घेतले आहे. स्पेनमध्ये होणाऱया स्पर्धेत पुरुषांच्या विभागात 57 किलो गटात हुसामुद्दीन मोहम्मद, 69 किलो गटात कृष्णन यादव, 75 किलो गटात आशिषकुमार, 81 किलो गटात सुमित सांगवान, 91 किलो गटात संजीत, 91 किलोवरील गटात सतीश कुमार हे भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करतील. टोकियो ऑलिम्पिकसाठी मेरी कोमप्रमाणेच पुरुष विभागात अमित पांघल, विकास कृष्णन, आशिष, सतीश आणि मनीष हे यापूर्वीच पात्र ठरले आहेत.
स्पेनमध्ये होणाऱया या स्पर्धेत महिला विभागात मेरी कोम, जस्मीन, मनीषा मौन, सिमरनजित कौर, बी. लवलिना, पूजा रानी भाग घेणार आहेत. त्याचप्रमाणे 21 ते 28 फेब्रुवारी दरम्यान होणाऱया स्ट्रेंजा स्मृती मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताचे बारा स्पर्धक भाग घेणार आहेत.









