गुरुग्राम / वृत्तसंस्था
सायबर सिटी गुरुग्राम येथील प्रसिद्ध मेदांता हॉस्पिटल बॉम्बस्फोटांनी उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. रुग्णालयाच्या कॉल सेंटरवर ही धमकी देण्यात आली. यानंतर रुग्णालयात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. रुग्णालय व्यवस्थापनाने तत्काळ पोलिसांना माहिती दिली. प्राथमिक तपासात काही गैरप्रकार असल्याचे दिसून आले नाही. मात्र, पोलीस हे प्रकरण गांभीर्याने घेत आहेत. यासोबतच अज्ञाताविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला आहे, मात्र आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. गुरुग्रामच्या मेदांता हॉस्पिटलमध्ये केवळ देशच नाही तर परदेशातूनही लोक उपचारासाठी पोहोचतात. येथे दररोज व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी लोक उपचारासाठी येतात. त्यामुळे धमकी मिळाल्यानंतर रुग्णालयाची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे.
एका अज्ञात व्यक्तीने फोन करून रुग्णालयात बॉम्ब असल्याची माहिती दिली होती. रुग्णालयाचे संचालक संजीव गुप्ता यांनी तत्काळ यासंबंधी पोलिसांना माहिती दिली. याप्रकरणी गुरुग्रामच्या सदर पोलीस ठाण्यात कलम 356/506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबतच पोलिसांनी फोन करणाऱया अज्ञात व्यक्तीचा शोध सुरू केला आहे.









