ऍलन मस्क यांचा नवा प्रकल्प : डुकराच्या डोक्यात बसविली चिप
वृत्तसंस्था/ सॅन फ्रान्सिस्को
टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि स्पेस-एक्सचे संस्थापक ऍलन मस्क यांनी मेंदूचे वाचन करणारी चिप सादर केली आहे. ही चिप नाण्याच्या आकारातील आहे. मस्क यांच्या पथकाने या चिपला गेरट्रु नावाच्या डुकराच्या डोक्यात बसवून मेंदूमधील हालचाली संगणकाच्या पडद्यावर पाहण्यास यश मिळविले आहे. ही चिप मेंदूला संगणकाशी जोडण्याचे काम करणार आहे. मस्कने लाइव्ह स्ट्रीमद्वारे मेंदूतील हालचाली पाहिल्या आहेत.
चिप लावलेल्या डुकराने डोकं हलविल्यावर आणि अन्न गिळण्यास प्रारंभ केल्यावर त्याच्या मेंदूतील हालचाली संगणकाच्या पडद्यावर दिसून येऊ लागल्या. मस्कचा न्यूरोलिंक स्टार्टअप वर्षभरापासून या प्रकल्पावर काम करत होते. वर्षभरापूर्वी न्यूरोलिंक कंपनीने एका उंदरावर या चिपची चाचणी केली होती. त्यावेळी केवळ उंदराच्या डोक्यात युएसबीशी जोडले गेलेल्या या चिपचे छायाचित्र समोर आले होते. माकडांवरही याचा प्रयोग करण्यात आला आहे. नजीकच्या भविष्यात मानवी परीक्षण करण्याची योजना आहे.
स्मरणशक्ती वाढविण्यासाठी वापर

या उपकरणाचा स्मरणशक्ती वाढविणे, मस्तिष्काघात किंवा अन्य मेंदूजन्य आजारांवरील उपचाराकरता वापर करता येणार आहे. याचबरोबर पक्षाघाताच्या रुग्णांसाठीही हे उपकरण उपयुक्त ठरणार आहे. रुग्णाचा मेंदू वाचून आम्ही डाटा जमवू शकू. स्पायनल कॉर्डला होणाऱया इजांमुळे शरीराचा भाग हलवू न शकणाऱया रुग्णांसाठी हे उपकरण सहाय्यभूत ठरू शकते अशी माहिती ऍलन मस्क यांनी दिली आहे.
चिप बसविण्याची कृती
ही चिप अत्यंत स्लिम असून यात 1000 तारा आहेत. या तारांची लांबी मानवी केसांच्या दहाव्या हिस्स्यासमान आहे. याची निर्मिती करण्यासाठी 2 वर्षांपासून अधिक काळ लागला आहे. उपकरणाला रोबोटच्या मदतीने डोक्यात इन्स्टॉल केले जाणार आहे. सर्जन या रोबोटच्या मदतीने मानवी डोक्यात 2 मिलिमीटरचे छिद्र पाडविणार आहेत. छिद्राद्वारे ही चिप मेंदूत बसविण्यात येणार आहे. तार किंवा थ्रेडसचे इलेक्ट्रॉड्स न्यूरल स्पाइक्सचे निरीक्षण करू शकतील. हे इलेक्ट्रॉड्स मानवी मेंदूला पूर्णपणे जाणून घेण्यासह त्याच्या वर्तनात येणारे उतार-चढावही समजून घेऊ शकतील.
चिपची कार्यपद्धत
न्यूरोलिंक तंत्रज्ञान मानवी मेंदूत चिप आणि वायरद्वारे काम करणार आहे. त्यांना केसांच्या खाली जोडण्यात येणार आहे. त्यांना वायरलेसद्वारे अन्य उपकरणांशी कनेक्ट करता येणार आहे. याच्या माध्यमातून मेंदूतील माहिती संगणकात जमा होणार आहे. भविष्यात मानवी मेंदूशी संबंधित महत्त्वपूर्ण माहिती आणि स्मृतीही संग्रहित करता येणार आहेत. ऍलन मस्क यांनी न्यूरोलिंक स्टार्टअपमध्ये 100 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली असून त्याचे मुख्यालय सॅन फ्रान्सिस्कोमध्ये आहे.









