चित्तगाँग
सोमवारपासून येथे सुरू झालेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत लंकेने पहिल्या डावात 397 धावा जमविल्या. लंकेच्या अँजेलो मॅथ्यूजचे द्विशतक केवळ एका धावेने हुकले. बांगलादेशच्या नईम हसनने 105 धावांत 6 गडी बाद केले. खेळाच्या दुसऱया दिवसअखेर बांगलादेशने पहिल्या डावात बिनबाद 76 धावा जमविल्या.
लंकेने 4 बाद 258 या धावसंख्येवरून दुसऱया दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांचे शेवटचे सहा गडी 139 धावांची भर घालत तंबूत परतले. 114 धावांवर नाबाद राहिलेल्या अँजेलो मॅथ्यूजचे द्विशतक केवळ एका धावेने हुकले. मॅथ्यूजने चंडीमलसमवेत पाचव्या गडय़ासाठी 136 धावांची भागिदारी केली. चंडीमलने 3 षटकार आणि दोन चौकारांसह 66 धावा जमविल्या. चंडीमल बाद झाल्यानंतर लंकेचे तळाचे फलंदाज अधिक धावा जमवू शकले नाहीत. द्विशतकाच्या समीप आलेला मॅथ्यूज नईम हसनच्या गोलंदाजीवर शकीब अल हसनकरवी शेवटच्या गडय़ाच्या रूपात झेलबाद झाला. मॅथ्यूजने 397 चेंडूत 1 षटकार आणि 19 चौकारांसह 199 धावा झळकविल्या. लंकेच्या पहिल्या डावात कुशल मेंडीसने 3 चौकारांसह 54, ओशादा फर्नांडोने 1 षटकार आणि 3 चौकारांसह 36 तर विश्वा फर्नांडोने 3 चौकारांसह नाबाद 17 धावा जमविल्या. लंकेचा पहिला डाव 153 षटकांत 397 धावावर आटोपला. बांगलादेशतर्फे नईम हसनने 6 बळी तर शकीब अल हसनने 60 धावांत 3 तसेच टी. इस्लामने 1 गडी बाद केला. लंकेच्या मॅथ्यूजने यापूर्वी कसोटी क्रिकेटमध्ये नाबाद 200 धावा झळकविल्या होत्या.
बांगलादेशने आपल्या पहिल्या डावाला सावध सुरूवात करताना दिवसअखेर 19 षटकांत बिनबाद 76 धावा जमविल्या. मेहमुदुल हसन 5 चौकारांसह 31 तर तमीम इक्बाल 4 चौकारांसह 35 धावावर खेळत आहेत. अंधूक प्रकाशामुळे पंचांनी 7 षटकांचा खेळ बाकी असताना दुसऱया दिवशीचा खेळ संपल्याची घोषणा केली. खेळाच्या शेवटच्या सत्रातील 40 मिनिटे अंधूक प्रकाशामुळे वाया गेली.
संक्षिप्त धावफलक
लंका प. डाव 153 षटकांत सर्वबाद 397 ( अँजेलो मॅथ्यूज 199, चंडीमल 66, कुशल मेंडीस 54, ओशादा फर्नांडो 36, विश्वा फर्नांडो नाबाद 17, नईम हसन 6-105, शकीब अल हसन 3-60, टी इस्लाम 1-107), बांगलादेश प.डाव 19 षटकांत बिनबाद 76 (मेहमुदुल हासन खेळत आहे 31, तमीम इक्बाल खेळत आहे. 35, अवांतर 10).









