सर्वपक्षीय जि.प. सदस्यांच्या मागणीनुसार 22 फेबुवारीला विशेष सभा
प्रतिनिधी / कोल्हापूर
शिंगणापूर क्रीडा प्रशालेतील कुस्ती मॅट घोटाळ्याची चौकशी झाली असून त्याचा अहवाल प्रशासनाकडे दिला आहे. 18 जानेवारीला झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये हा चौकशी अहवाल सर्व सदस्यांना दिला जाईल असे तत्कालिन सीईओ अमन मित्तल यांनी सांगितले होते. पण अद्याप एकही सदस्याला तो मिळालेला नाही. त्यामुळे या अहवालावर सविस्तर चर्चा करण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभा घ्यावी, अशी मागणी सर्वपक्षीय सदस्यांनी अध्यक्ष बजरंग पाटील व सीईओ संजयसिंह चव्हाण यांच्याकडे मंगळवारी केली. त्यानुसार 22 फेब्रुवारीला सभा घेण्याचे निश्चित झाले असून त्यामध्ये मॅटसह शिक्षक बदल्यांबाबतही वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषदेतील एका महिला अधिकाऱ्याने भाजपचे पक्षप्रतोद विजय भोजे यांच्यावर नुकताच विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. मॅट प्रकरणावरून भोजे त्रास देत असल्याचे तक्रार अर्जात नमूद आहे. पण चौकशी अहवालामध्ये शिक्षण विभागावर ठपका ठेवला असल्यामुळे आणि त्यामध्ये सबंधित महिला अधिकारीही दोषी ठरत असल्यामुळेच खोटी तक्रार दिल्याचे भोजे यांनी प्रसारमाध्यमांसमोर स्पष्ट केले आहे.
त्यामुळे या प्रकरणाचा चौकशी अहवाल सर्व जिल्हा परिषद सदस्यांना देऊन त्याबाबत चर्चा करण्यासाठी तत्काळ विशेष सभा घ्यावी, अशी मागणी सर्वपक्षीय सदस्यांनी अध्यक्ष बजरंग पाटील व सीईओ चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. त्यानुसार कुस्ती मॅट घोटाळ्याचा चौकशी अहवाल, प्राथमिक शिक्षकांच्या सन 2019 पासून केलेल्या बदल्या, प्राथमिक शिक्षकांची आगाऊ वेतनवाढ आणि आयत्या वेळेच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी 22 फेब्रुवारीला विशेष सर्वसाधारण सभा घेण्याचे निश्चित झाले. यावेळी शिक्षण सभापती प्रविण यादव, महिला व बालकल्याण समिती सभापती पद्माराणी पाटील, समाजकल्याण सभापती स्वाती सासणे, सदस्य अरूण इंगवले, भगवान पाटील, शंकर पाटील, अशोकराव माने, राजवर्धन नाईक-निंबाळकर, विजय बोरगे, पांडूरंग भांदिगरे, राहूल देसाई, मनोज फराकटे, महेश चौगले, विनय पाटील, सरदार मिसाळ, विशांत महापूरे, सर्जेराव पाटील-पेरीडकर, चेतन पाटील, सुभाष सातपुते, अमर पाटील आदी उपस्थित होते.
15 फेब्रुवारीपर्यंत मॅट घोटाळ्याचा चौकशी अहवाल द्या
मॅट घोटाळ्यातील अहवालावर सविस्तर चर्चा करण्यासाठी सर्व सदस्यांना 15 फेब्रुवारीपर्यंत अहवाल द्यावा अशी मागणी अध्यक्ष बजरंग पाटील यांच्याकडे करण्यात आली. तसेच सभेस सर्व खातेप्रमुखांना उपस्थित राहण्याच्या प्रशासनाने सूचना द्यावी अशी मागणीही निवेदनात नमूद आहे.
पदाधिकारी व अधिकाऱयांच्या दालनात सीसीटीव्ही बसवा
एका महिला अधिकाऱयाने जिल्हा परिषद सदस्यावर गंभीर स्वरूपाची तक्रार दाखल केली आहे. आगामी काळात अशा तक्रारी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे पदाधिकाऱयांसह अधिकाऱयांच्या दालनामध्ये सीसीटीव्ही बसवावेत, म्हणजे सत्य लपून राहणार नाही, अशी मागणी सदस्या सरिता खोत यांचे पती शशिकांत खोत यांनी केली.
म्हातारी मेल्याचं दुख नाही काळ सोकावतोय !
महिला अधिकाऱयाने जिल्हा परिषद सदस्यांवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला आहे. पण आमचा सदस्य असे वर्तन करणारच नाही ही आमची खात्री आहे. ही तक्रार खासगी असली तरी त्यामध्ये मॅट घोटाळ्याचा संदर्भ आला आहे. त्यामुळे आपला गैरकारभार लपाविण्यासाठी अशा पद्धतीची तक्रार केली जात असेल तर या घोटाळ्याच्या अहवालानुसार संबंधितांवर कडक कारवाई होणे अपेक्षित आहे. `म्हातारी मेल्याचं दुख नाही, पण काळ सोकावता कामा नये’ अशी मागणी सदस्य अरुण इंगवले यांनी केली.
बोलवता धनी कोण ?
जिल्हा परिषदेतील महिला अधिकाऱयास तक्रार देण्यास भाग पाडणारा बोलवता धनी कोण आहे ? याचा शोध नक्की घेतला जाईल असा विश्वास उपस्थित जि.प.सदस्यांनी व्यक्त केला.