प्रतिनिधी / बेळगाव
लग्नाला 12 वर्षे उलटली तरी मूल न झाल्याने झालेल्या मनस्तापातून पिरनवाडी येथील एका कामगार युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली आहे. बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
संभाजी रामचंद्र घेवडे (वय 40) मूळचा राहणार बनहट्टी जि. बागलकोट, सध्या राहणार पिरनवाडी असे त्याचे नाव आहे. यासंबंधी संभाजीच्या आईने बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून मूल न झाल्याच्या मनस्तापातून त्याने आत्महत्या केल्याचे म्हटले आहे.
संभाजी हा लग्नाआधीपासून कामानिमित्त बेळगावात राहात होता. कारखान्यात काम करीत होता. घटनेची माहिती समजताच बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.