महिलांच्या शरीरात बरेच हार्मोनल बदल होत असतात. त्यातही मासिक पाळीच्या काळात स्वभाव थोडा चिडचिडा होतो. छोटय़ा छोटय़ा गोष्टींचा राग येतो. कधी खूप नैराश्य येतं, वैताग येतो. मात्र या शारीरिक बदलांमुळे तुमच्या नात्यात कोणताही दुरावा येता कामा नये. चिडचिड, राग यामुळे नातेसंबंध बिघडता कामा नयेत. यासाठी नेमकं काय करता येईल? जाणून घेऊ.
- मुळात शारीरिक बदलांना सामोरं जाताना महिलांनी स्वतःला वेळ द्यायला हवा. त्यामुळे थोडा वेळ एकांतात घालवा. स्वतःमधले बदल समजून घ्या. आपल्याला नेमकं काय होतंय हे जाणून घेणं खूप आवश्यक आहे. हे सगळे शारीरिक आणि
हार्मोनल बदल आहेत हे आधी समजून घ्या. आपली भावनिक आणि मानसिक स्थिती जोडीदाराला समजावून सांगा. आधी स्वतःला समजून घ्या. मग इतरांना समजावून सांगा. - प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला. आपल्याला खूप मोठी वाटणारी एखादी समस्या तितकी गंभीर असतेच असं नाही. बरेचदा छोटय़ा छोटय़ा मुद्यांना आपण अधिक प्राधान्य देतो आणि नाहक वादात अडकतो.
- मूड स्वींगच्या काळात जोडीदाराला विश्वासात घ्या. उगाच आरडाओरडा किंवा चिडचिड करून काहीही साध्य होणार नाही. वाद वाढवत नेऊ नका. तुमची नेमकी परिस्थिती त्यांना समजावून सांगा.
- मूड स्वींगवर मात करण्यासाठी सकारात्मक रहा. स्वतःचा आनंद शोधा. मुख्य म्हणजे शांत रहा. दिवसाचं वेळापत्रक तयार करा. त्यानुसार काम करा. पुरेशी झोप आणि सकस आहार घ्या.









