राज्यातील अनेक नदी, नाल्यांना पूर : बहुतांश शेती, रस्ते गेले पाण्याखाली,पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
प्रतिनिधी /पणजी
आभाळ फाटल्यागत राज्यात पडलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. गेल्या 24 तासात पणजीत 4 इंच आणि सकाळी 8.30 ते सायं. 5.30 या दरम्यान 3 इंच पावसामुळे पणजीत एकूण 7 इंच पावसाची नोंद झाली. मुसळधार पावसाने राज्यातील अनेक नदी नाल्यांना पूर आला. कित्येक ठिकाणी शेत पाण्याने तुडूंब भरले, बाजूचे रस्तेही पाण्याखाली गेले. राज्यात अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. कित्येक घरांचेही नुकसान झाले. हवामान खात्याने पावसाचा जोर पुढील 3 दिवसांपर्यंत असाच राहिल, असा पुन्हा एकदा इशारा दिला आहे.
पणजीतील परिस्थिती मुसळधार पावसाने बेहाल झाली. गोव्याचे नरिमन पॉईंट ठरलेले पाटो प्लाझातील रस्ते पाण्याखाली गेले. पणजीतील सर्व रस्ते दुपारपर्यंत पाण्याखाली गेलेले होते. हताश महापालिकेने तात्काळ कोणत्याही उपाययोजना हाती घेतल्या नाहीत.
सकाळच्या सत्रात विक्रमी पावसाची नोंद
मान्सून सक्रिय आहे, त्यातच आंध्र प्रदेशजवळ कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने व अरबी समुद्राच्या काठाशी मोठय़ा प्रमाणात पावसाळी ढगांनी आक्रमण केल्याने संपूर्ण गोव्याला सलग तिसऱया दिवशी पावसाने झोडपून काढले. पणजीत सकाळपासून सायंकाळपर्यंत 3 इंच पावसाची नोंद झाली. सकाळी 8.30 ते दुपारी 11.30 वाजेपर्यंत पणजीत 3 तासात 72 मि.मी. एवढी विक्रमी पावसाची नोंद झाली. दुपारपासून पावसाचा जोर थोडा कमी झाला असला तरी अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या.
राजधानीतील रस्ते पाण्याखाली
रात्रभर पाऊस चालूच होता आणि सकाळपासून पावसाचा जोर वाढतच गेला. त्यामुळे पाटो पणजी ते बसस्थानकपर्यंतचे सारे रस्ते पाण्याखाली गेले. ईडीसी पाटो प्लाझा येथील संपूर्ण रस्ते पाण्याखाली गेले आणि पणजीत पुरसदृश स्थिती निर्माण झाली. याशिवाय 18 जून, आत्माराम बोरकर रस्ता, महात्मा गांधी रस्ता इत्यादी अनेक रस्ते पाण्याखाली गेले. अनेक वाहने पाण्यात बुडाली. पणजीत 18 जून रस्त्यावरील वाहतूक काही काळ बंद करणे वाहतूक पोलिसांना भाग पडले. त्याचबरोबर कांपाल ते मिरामार या दरम्यानचा संपूर्ण बांदोडकर रस्ताही पाण्याखाली गेला.
महापौर, कर्मचारी गेले कुठे?
या परिस्थितीत विद्यमान महापौर पणजीत कुठे दिसलेच नाही. शिवाय पालिका कर्मचारीही कुठे दिसले नाहीत. गेल्या दोन वर्षात पणजीत जेव्हा जेव्हा प्रचंड पाऊस झाला व काही भागात पाणी साचणार असे वातावरण तयार होताच तत्कालीन महापौर उदय मडकईकर हे स्वतः पालिका कर्मचाऱयांना घेऊन रस्त्यावर उतरले. गटारात अडकलेला कचरा काढून पाण्याचा निचरा होण्यास मदत केली. त्यामुळे गेल्या दोन वर्षात कुठेही पाणी साचले नाही. मात्र मडकईकर आता महापौर नाहीत आणि पणजीच्या समस्यांना कोणी वाली नाही, याचा प्रत्यय मंगळवारी पणजीकरांना आला. महापालिकेचे कर्मचारी कुठे दिसले नाहीत.
सरासरीपेक्षा तीन इंच अधिक पाऊस
मंगळवारी पणजीत स. 8.30 ते सायं. 5.30 या दरम्यान 3 इंच, पेडणेत 3 इंच, काणकोण 2 इंच, जुनेगोवे 3 इंच, म्हापसा 4 इंच व मुरगावमध्ये 2 इंच एवढी विक्रमी पावसाची नोंद झाली. या मुसळधार पावसाने कालपर्यंत सरासरी गाठलेली आता सरासरीपेक्षा 3 इंच जास्त पाऊस पडलेला आहे.
पावसाचे अर्धशकत!
दरम्यान गेल्या 24 तासात पडलेला पाऊस आणि त्यानंतर मंगळवारी स. 8.30 ते सायं. 5.30 या दरम्यान पडलेला पाऊस एकत्रित केल्यानंतर राज्यात यंदाच्या मौसमात पडलेला पाऊस सरासरी 51 इंच झालेला आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत तो 5 इंच अधिक पडलेला आहे.
17 जुलैपर्यंत सर्वत्र मुसळधार पाऊस
सायंकाळी हवामान खात्याने जारी केलेल्या माहितीनुसार दि. 17 जुलैपर्यंत गोव्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडणार असल्याने त्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मंगळवारी मुसळधार पावसाबरोबरच जोरदार वारे वहात होते. आता 17 जुलैपर्यंत मुसळधार पावसाबरोबरच जोरदार वादळी वारे वहाण्याची शक्यता आहे.
साळावली धरण झाले तुडुंब
या पावसामुळे राज्यातील नदीनाल्याना पूर आलेले आहेत. मात्र परिस्थिती नियंत्रणात असली तरी साळावली हे धरण तुडुंब भरलेले असून साळावली धरण परिसरात जाण्यास सरकारने बंदी घातली आहे. धरणे तुडूंब भरल्याने आता पाण्याचा विसर्ग केला जाणार असल्याने सांखळी तसेच साळ, कोलवाळ, इब्रामपूर आदी भागात पूर वाढण्याची शक्यता आहे.









