भारतभर देवी आदिशक्तीचा उदो उदो सुरू आहे. घरोघर उपवास ठेवले जात आहेत. देवीचा महिमा गायिला जात आहे. स्त्रीला आदिशक्ती रूपात विविध माध्यमातून सादर केले जात आहे. देवीचे कोडकौतुक म्हणून तिच्या नऊ रूपांची पूजा मांडली जात आहे. रोज एका रंगाची वस्त्रप्रावरणे परिधान करून समाज माध्यमांवर त्याचे प्रदर्शन सुरू आहे. स्त्री जन्माचे स्वागत करा इथपासून ते घरात येणारी मुलगी म्हणजे कुटुंबाचे सार्थक करणारी धनाची पेटी आहे इथपर्यंत अनेक गोष्टी सांगितल्या जात आहेत. कुमारिका आणि सुवासिनींची आवर्जून बोलावून पूजा केली जात आहे. देवीसमोर रोज एक सुगंधी फुलांची माळ आणि तिळाच्या तेलाची वात नऊ दिवस तेवती ठेवण्यासाठी लक्ष ठेवून उपासना केली जात आहे. घटाभोवती वावरीत बियाणे रोपले आहे आणि अंकुरण्याची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. घरोघरी घटस्थापनेची अशी लगबग सुरू असताना सांगलीच्या वसंतदादा पाटील सर्वोपचार रुग्णालयात बेळगाव जिह्यातील हुक्केरी तालुक्मयातील एका 30 वषीय महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला. ही मुलगी 41 तासांची होईपर्यंत ती महिला अस्वस्थच होती. तिने मुलीच्या गळय़ाला कापडाचा फास आवळला. देवीच्या समोरची वात घरोघर तेवती असली तरी या मुलीच्या आयुष्याचा दिवा मात्र क्षणार्धात निमाला. अस्वस्थ आई तशीच दवाखान्यात मुलीसह पडून राहिली. रात्रीच्या वेळी बाळ निपचित पडले आहे ही बाब चाणाक्ष नर्सच्या लक्षात आली. तसे तर या दवाखान्यात भरमसाठ गर्दी असते. पण, त्यातूनही त्या नर्सने ही बाब हेरली आणि मुलीचा श्वास लागत नाही म्हणून तिला अतिदक्षता विभागात घेऊन गेली. तिथेही उपचाराला काही साथ मिळत नाही म्हटल्यावर डॉक्टरी शोधात मुलीच्या गळय़ाजवळील व्रण सर्व काही सांगून गेला. देवीचा सर्वत्र जयजयकार सुरु असताना एका आईने आपल्या मुलीचा जीव का घेतला यामागील कारण पोलीस शोधत आहेत. सरधोपटपणे विचार केला तर या घटनेमागे वंशाला दिवा असावा अशी समाजाची असलेली धारणा कारणीभूत आहे असे कोणालाही सहजपणे वाटून जाते. पण पोलीस तपासात अशा धारणांना महत्त्व नसते. त्यांना महिला मनोरुग्ण आहे किंवा आणखी काही कारणे आहेत का, याचाही शोध घ्यावा लागतो. ही कारणे शोधायला पुढचे तीन-चार दिवस जातील. पण समाजात जी प्राथमिक चर्चा सुरू होते ती मुलीच्या जन्मानंतर कुटुंबाकडून तिच्या स्वीकाराबाबत घेतले जाणारे आढेवेढे, कुटुंबातीलच ज्ये÷ महिलांकडून मातेला दिला जाणारा दोष. तिच्या कुटुंबाचा होणारा उद्धार, तिच्या आईलाही अधिक मुलीच असतील तर तिलाही दिला जाणारा दोष याची चर्चा घडते. इतके आपल्याकडे ते सहज बनले आहे. आपण एखाद्या स्त्रीला दोष देतो म्हणजे तिच्या मनाशी-भावनेशी खेळतो याची जाणीवही कदाचित दोष देणाऱयांना असत नाही. त्या दबावापोटी महिला नाईलाजाने आपल्या मुलीचा बळी द्यायलाही मागेपुढे पाहत नाहीत. अशा घटना समोर आल्यानंतर कुणी म्हणेल, गळा दाबणारी आई ही कदाचित केवळ एक दृश्य रूप आहे. तिला तसे भाग पाडायला नेमकी कोणती परिस्थिती कारणीभूत होती याचा देखील विचार करायला हवा. कोणी म्हणेल, तिची तशी मानसिकता बनायला इथली पुरुष सत्ता, मुलाला असलेले महत्त्व आणि मुलीबाबतची दुय्यम भूमिका कारणीभूत असू शकते .कुणी म्हणेल, पूर्वी स्त्री जीवन इतके भीषण बनले होते की जे आपण भोगतो ते आपल्या मुलीच्या वाटय़ाला येऊ नये म्हणून कित्येकदा आई किंवा इतर नातेवाईक त्या बाळाला जन्मतः ठार मारत. त्यासाठी आई विष लावून मुलीला दूध पाजत, वाहत्या नदीत सोडत, गळा दाबत, नरडीला नख लावत , उकळत्या दुधाच्या कढईत टाकत किंवा जिवंतच दफन करत. तसेच काहीसे या महिलेने केले असावे, कारण तिच्या आसपासची परिस्थिती बदललेलीच नसेल. एकाच घटनेला असे अनेक कंगोऱयातून पाहिले जाईल. पण, अंतिम सत्य काय आहे हे समाजासमोर येईलच याची खात्री नाही. पोलीस आपला निष्कर्ष काढायला दोन तीन दिवस लावतील, तर तोपर्यंत लोक ही घटना विसरूनही गेलेले असतील. कारण त्याहून काही भीषण वास्तव त्यांच्या समोर नाचत असते. मात्र सांगलीत घडलेले बेळगाव जिह्यातील महिलेचे सत्य याहूनही अधिक गंभीर असावे. अर्थात हाही आमचा प्राथमिक अंदाज आहे. पण, आतापर्यंत समोर आलेले वास्तव असे आहे की, या महिलेला झालेली मुलगी ही तिच्या पहिल्या पतीपासून आहे. पत्नी गरोदर असताना त्याने तिचा त्याग केला. आधीच परित्यक्ता, त्यात गरोदर! म्हणजे तिच्या जीवनाची काय दशा होणार हे समजतेच. तशाही स्थितीत कोणीतरी या महिलेला आधार शोधला. तिचा गोव्यात कुठेतरी काम करणाऱया एका व्यक्तीबरोबर विवाह जमवण्यात आला. त्याने तिचा स्वीकार केला. मात्र, तिच्या बाळाचा तो स्वीकार करेल किंवा नाही याबाबत संदिग्धता होती. या तणावाच्या स्थितीत त्या महिलेने आपल्या मुलीच्या गळय़ाला फास आवळला असावा. खून हा गंभीर अपराध आहेच पण ती महिला तिकडे का वळली याचा विचार समाजाने करायचा आहे. ती जर मनोरुग्ण नसेल तर या गंभीर अपराधाची तिला शिक्षाही मोठीच होईल. पण, तसेही आयुष्य हेच तिच्यासाठी न केलेल्या अपराधाची मोठी शिक्षा बनलेले असताना या अपराधाची एक शिक्षा त्यात भर घालण्या पलीकडे काय घडणार? एका परित्यक्ता स्त्रीला तिच्या मुलीसह स्वीकारले जाणार नाही याचा तिच्या मनावर असलेला परिणाम, देवीचा उदो उदो करताना तरी समाजाने नक्कीच विचारात घ्यावा…. या गंभीर सामाजिक समस्येवर समाजधुरिणांनी उत्तर शोधून त्याचा आदर्श समाजासमोर ठेवावा, इतकेच….!
Previous Articleलेडी धुंडीराज
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








