फातोर्डा येथील राजेंद्र तेलगू यांची बिकट स्थिती : सरकारला मदतीचे आवाहन
प्रतिनिधी / मडगाव
फातोर्डा येथील रहिवासी आणि मडगावातील श्री दामोदर महाविद्यालयाच्या पहिल्या तुकडीचे विद्यार्थी राजेंद्र तेलगू यांनी मूत्रपिंडाच्या समस्येने ग्रस्त असलेल्या आपल्या मुलास आपले एक मूत्रपिंड दान केले आहे. त्यासाठी ते चेन्नईत गेले होते आणि सध्या ते तिथेच अडकून पडले आहेत. त्यांना गोव्यात आणण्याच्या दृष्टीने सरकारने प्रयत्न करावेत, अशी मागणी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेने केली आहे.
तेलगू यांनी आतापर्यंत शस्त्रक्रियेसाठी सुमारे 14-15 लाख रुपये खर्च केले आहेत. कोणाकडूनही त्यांना मदत मिळालेली नाही. या साथीच्या परिस्थितीत त्यांना चेन्नईत खाण्याचा आणि राहण्याचा त्रास तसेच आर्थिक समस्या सहन कराव्या लागत आहेत. माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष या नात्याने आपण त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी आणि चेन्नईहून ते गोव्यात लवकरात लवकर परत येण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, असे मडगावातील विवेक नाईक यांनी म्हटले आहे. गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करावा आणि तेलगू यांना परत येण्यास मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
तेलगू हे त्यांच्या मुलाला मूत्रपिंड दान करण्यासाठी फातोर्डाहून चेन्नईला गेले होते. मूत्रपिंडाचे यशस्वीरीत्या प्रत्यारोपण करण्यात आले होते. पण ज्या दिवशी ते परत येणार होते त्याचदिवशी लॉकडाऊन सुरू होऊन त्यांचे विमानाचे तिकीट रद्द झाले होते. सध्या चेन्नईत त्यांना बराच त्रास सहन करावा लागत आहे. त्यांनी बऱयाच राजकारण्यांकडे संपर्क साधला. पण आजतागायत कोणीही त्यांची समस्या सोडवू शकलेला नाही. तेलगू यांना मदत करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. पण अजूनपर्यंत काहीच सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही, असे नाईक यांनी माहिती देताना सांगितले.