ऑनलाईन टीम / हैदराबाद :
लॉकडाऊनमुळे आंध्रप्रदेशातील नेल्लोर येथे अडकलेल्या आपल्या मुलाला घरी परत आणण्यासाठी एका आईने तब्बल 1400 किमीचा प्रवास स्कुटरवरून केला आहे.
रजिया बेगम असे स्कुटरवरून प्रवास केलेल्या महिलेचे नाव आहे. त्या एका सरकारी शाळेत मुख्याध्यापिका असून, त्या तेलंगणामधील रहिवासी आहेत. १५ वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचे निधन झाले आहे.त्यांना दोन मुले आहेत.
त्यांचा निजामुद्दीन नावाचा 19 वर्षीय मुलगा 12 मार्चला आपल्या मित्राला सोडण्यासाठी नेल्लोर येथे गेला होता. त्यानंतर तो तिथेच राहिला. तितक्यात देशात लॉकडाउन जाहीर झाला आणि निजामुद्दीनच्या परतीचा मार्ग बंद झाला. त्यामुळे मुलाच्या घरी परतण्याची चिंता लागल्याने त्याला स्वतः आणण्याचा निश्चय त्यांनी केला. त्यासाठी पोलिसांची परवानगीही मिळवली.
6 एप्रिलला सकाळी रजिया बेगम यांनी प्रवासाला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्या नेल्लोर येथे पोहोचल्या. त्याचदिवशी त्यांनी मुलासोबत परतीचा प्रवास सुरु केला. बुधवारी संध्याकाळी आपण घरी पोहोचलो अशी माहिती रजिया बेगम यांनी एका वृत्तसंस्थेला दिली आहे.









