ऑनलाईन टीम / लखनऊ :
अयोध्येतील राम मंदिराच्या निर्मितीसाठी संपूर्ण देशातून देणगी गोळा करण्याच्या मोहिम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यातच आता समाजवादी पार्टीचे संरक्षक आणि माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांच्या सूनने म्हणजेच अपर्णा यादव यांनी या मंदिरासाठी 11 लाख रुपयांची देणगी दिली आहे. यावेळी त्यांनी मुलायम यांच्या कार्यकाळात कारसेवकांवर झालेल्या गोळीबारावरही मत व्यक्त केले आहे.

अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या निर्मितीसाठी देशभर निधी संकलन मोहीम राबवली जात आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून अवध प्रांताचे प्रचारक कौशल आणि कार्यवाह प्रशांत भाटीया हे अपर्णा यादव यांच्या निवासस्थानी गेले होते. त्यावेळी त्यांनी राम मंदिरासाठी 11 लाख रुपयांची देणगी दिली.
‘राम मंदिर हा आमच्या आस्था आणि श्रद्धेचा विषय आहे. त्यासाठी आम्ही अयोध्येतील राम मंदिरासाठी स्वच्छेने 11 लाख रुपये दिले आहेत. राम हा देशाचे चरित्र, संस्कार आणि सर्व प्रकारच्या आस्थेचे केंद्र आहे. हे देशाचे मंदिर आहे. प्रत्येकाने या मंदिरासाठी दान द्यायला हवे, असे मला वाटते आणि याच भावनेतून मी देखील दान दिले आहे, असे अपर्णा यादव यांनी सांगितले.
- कारसेवकांवरील गोळीबारावर म्हणाल्या…
अपर्णा यादव यांनी मुलायम सिंह यादव यांच्याकडून अयोध्येतील कारसेवकांवर गोळीबार केल्याच्या आरोपालाही उत्तर दिले आहे. ‘यापूर्वी जे झाले ते ज्या परिस्थितीमध्ये झाले ते अत्यंत दु:खद होते. मला त्यावर काही प्रतिक्रिया द्यायची नाही. ते आता घडून गेले आहे. आज बदलले जाऊ शकत नाही. आपण आजचा विचार केला पाहिजे. आज आम्ही या पैशांचे समर्पण केले आहे. येणारी पिढी देखील रामाची अनुयायी म्हणून काम करेल, असेही त्यांनी यावेळी म्हटले.









