
वार्ताहर /नंदगड
मुर्कवाड (ता. हल्याळ) येथे घराची भिंत कोसळून आई व मुलगी जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी पहाटे साडेचारच्या दरम्यान घडली.
रुक्मिणी विठ्ठल माचक (वय 37) व श्रीदेवी विठ्ठल माचक (वय 13) अशी मृत झालेल्या माय-लेकींची नावे आहेत. गेल्या आठवडाभरापासून तालुक्मयात संततधार पाऊस पडत आहे. त्यामुळे जुन्या कौलारू घरांच्या भिंतांना भेगा पडल्या आहेत. पावसामुळे पाया खचून भिंती कमकुवत झाल्या आहेत. मुर्कवाड येथील विठ्ठल माचक यांच्या कौलारू घराची अवस्था वरीलप्रमाणेच झाली होती. नेहमीप्रमाणे विठ्ठल माचक हे आई व मुलगा यांच्यासह घराच्या समोरील खोलीत तर पत्नी रुक्मिणी व मुलगी श्रीदेवी आतील खोलीत झोपले होते. मंगळवारी पहाटे साडेचारच्या दरम्यान गाढ झोपेत असतानाच अचानकपणे घराची भिंत कोसळून त्याखाली पत्नी रुक्मिणी व मुलगी श्रीदेवी गाडल्या गेल्या. यावेळी झालेल्या मोठय़ा आवाजाने जागे झालेल्या विठ्ठल यांनी घराबाहेर येऊन आरडाओरड केली. त्यानंतर काहींनी त्या माय-लेकीला मुर्कवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. परंतु त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
घटनेमुळे गावात हळहळ
या घटनेची नोंद हल्याळ पोलीस स्थानकात झाली आहे. हल्याळ येथील इस्पितळात शवविच्छेदन करून ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे मुर्कवाड गावात हळहळ व्यक्त होत आहे.









