प्रतिनिधी / वास्को
मुरगाव पालिका निवडणुक तयारीला नव्याने सुरवात झालेली असून अनेक ईच्छुक उमेदवारांनी नव्याने निर्णय घेऊन यशाची चाचपणी सुरू केली आहे. राखीव प्रभागांचा प्रश्न संपुष्टात आल्याने ईच्छुक उमेदवारांना आता निवडणुकीची तारीख जाहीर होण्याची प्रतिक्षा लागलेली आहे. अनेक उमेदवारांनी आपले पुनर्वसन सुरक्षीत प्रभाग करून घेतले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मागची निवडणुक प्रक्रिया रद्द ठरवून नव्याने प्रक्रिया सुरू करण्याचा आदेश निवडणुक आयोग व राज्य सरकारला दिल्यानंतर मुरगाव पालिका क्षेत्रातील अनेक उमेदवारांची निराशा झाली होती. सरकारच्या आरक्षण धोरणाला विरोध करून आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा धसका असतानाही उमेदवारांनी परिस्थितीशी जुळवून घेत निवडणुकीत विजयी होण्याचा चंग बांधला होता. काहींचा विजय समीप आला होता. मात्र, न्यायालयाच्या आदेशामुळे सर्वांचेच कष्ट वाया गेले. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार नगरविकास खात्याने नव्याने आरक्षण जाहीर केले. पुन्हा जाहीर झालेल्या आरक्षणामुळे अनेक ईच्छुक उमेदवारांची चांगली सोय झाली. तर काही उमेदवारांना नाऊमेद व्हावे लागले. काहींची निवडणुक लढवण्याची संधीच हुकली. काहींना विजयाची संधीही हुकल्याने त्यांच्या नेत्यांचेही नुकसान झालेले आहे. प्रभाग राखीवता बदलल्याने आता या उमेदवारांनी आणि त्यांच्या नेत्यांनी पुन्हा हालचाली करून प्रभागांची अदलाबदल केली आहे. काही ईच्छुक उमेदवार अद्यापही निवडणुक लढवण्यासाठी प्रभागांची चाचपणी करीत आहेत. आरक्षणामध्ये फेरबदल झाले तरी मुरगावच्या काही प्रभागांना फरक पडलेला नाही. तेथील उमेदवारांनी काही दिवस थांबून आपल्या प्रचार कार्याला पुन्हा सुरवात केलेली आहे. ईच्छुक उमेदवारांना सध्या निवडणुकीची तारीख जाहीर होण्याची प्रतिक्षा लागलेली आहे.
माजी नगराध्यक्षांची आव्हान याचिका फेटाळली

मुरगावचे माजी नगराध्यक्ष क्रितेश गावकर यांना नव्या आरक्षणाचा जबरदस्त फटका बसला. त्यांनी यापूर्वी निवडणुका लढवलेले दोन प्रभाग इतर मागास वर्गीय व अनुसुचित जमातींसाठी राखीव ठरल्याने त्यांना निवडणुकीतून माघार घेणे भाग पडलेले आहे. त्यांच्या प्रभागाचे झालेले आरक्षण अन्यायकारक व कायदय़ाला धरून नसल्याचा दावा करून गावकर यांनी नगरविकास खात्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्याचा प्रयत्न सफल होऊ शकलेला नाही. त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने ही याचिका स्विकारण्यास नकार दिल्याची माहिती गावकर यांनी दिली. काल बुधवारी ही आव्हान याचिका फेटाळण्यात आली.
बायणातील लियो रॉड्रिग्स यांचे दाबोळीतील प्रभागात पुनःर्वसन

प्रभाग 25 या आपल्या प्रभागाला पर्यायी उमेदवार म्हणून गावकर यांनी यापूर्वीच नगरविकासमंत्री मिलिंद नाईक यांचे खंदे समर्थक व बायणातील माजी नगरसेवक लियो रॉड्रिक्स यांना समोर आणले आहे. या प्रभागामध्ये गावकर यांनी लियो यांचा प्रचारही सुरू केलेला आहे. लियो रॉड्रिक्स हे सुडाचे उपाध्यक्ष होते. त्यांनी सध्या राजीनामा दिलेला आहे. बायणातील त्यांचा प्रभाग क्रमांक 9 नव्या आरक्षणामुळे अनुसुचीत जातींसाठी राखीव ठरलेला आहे. त्यामुळे त्यांनाही निवडणुकीपासून दूर राहावे लागणार होते. मात्र, क्रितेश गावकर यांनी सध्या प्रभाग क्रमांक 25 या इतर मागासवर्गीयांसाठी राखीव असलेल्या प्रभागात त्यांचे पुनर्वसन केले आहे. या पुनर्वसनामुळे भाजपांतर्गंत धुसफुस अधिकच वाढण्याची शक्यता आहे.








