प्रतिनिधी/ पणजी
देश स्वतंत्र झाला म्हणून ज्यांनी 15 ऑगस्टला दुखवटा पाळला, राष्ट्रध्वज कार्यालयावर लावण्यास ज्यांना 52 वर्षे लागली त्यांनी पं. जवाहरलाल नेहरूंवर बोलू नये. देशाच्या स्वातंत्र्यलढय़ात संघाच्या किती नेत्यांनी भाग घेतला हे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट करावे आणि नंतरच पं. नेहरुंवर बोलावे, असा सल्ला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.
नेहरुंमुळे गोवा स्वतंत्र होण्यास उशीर झाला असे विधान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले होते. त्याचा चोडणकर यांनी पुरेपुर समाचार घेतला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली. मुख्यमंत्र्यांनी अगोदर नेहरू काय हे समजून घ्यावे. मुख्यमंत्र्यांनी आपले अज्ञान लोकांसमोर मांडले. मुख्यमंत्री अगोदर सभापती होते. त्यावेळी त्यांनी स्वातंत्र्य लढय़ावरील पुस्तके वाचायला हवी होती. ‘सिलेक्टेड वर्क ऑफ नेहरू’चे 89 भाग आहेत. ते त्यांनी वाचावे. असत्य बोलणे ही संघ आणि भाजपची विचारसरणी आहे, असेही ते म्हणाले.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संघाच्या कार्यालयावर तिरंगा झेंडा फडकण्यास तब्बल 52 वर्षे का लागली हे मुख्यमंत्री सावंत यांनी स्पष्ट करावे. देशाचा झेंडा तिरंगा स्वीकारण्यास संघाने एवढा काळ का काढला. 2002 साली संघाने आपल्या कार्यालयावर तिरंगा लावला. संघाचे राष्ट्रप्रेम जागृत क्हायला 52 वर्षे का लागली असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. देश स्वातंत्र्य झाला त्यावेळी संघाने दुखवटा पाळला. ब्रिटीश गेलेले त्यांना नको होते. ब्रिटीश गेल्याचे त्यांना दुःख आले. मुख्यमंत्र्यांना हे माहित नसावे. संघाचे सर्वच नेते ब्रिटिशांच्या सोबत होते असा गंभीर आरोपही चोडणकर यांनी केला.









