बेंगळूरमधील पदाधिकाऱयांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा
प्रतिनिधी/ बेळगाव
स्वच्छता कर्मचाऱयांनी कामबंद आंदोलन सुरू केल्यामुळे संपूर्ण राज्यातच समस्या निर्माण झाली. कचऱयाचे ढीग पडून होते. शुक्रवारी आंदोलन केल्यानंतर सायंकाळी बेंगळूरमधील संघटनेच्या पदाधिकाऱयांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्याशी चर्चा केली. या स्वच्छता कर्मचाऱयांना कायमस्वरुपी नोकरीत सामावून घेण्याचे ठोस आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. याचबरोबर इतर योजनाही लागू करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे बेळगावमधील कर्मचाऱयांनी कचरा उचल करण्याचे काम सुरू केले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून स्वच्छता कर्मचारी कंत्राटी पद्धतीनेच काम करत आहेत. त्यांना कंत्राटदारांकडून वेतन दिले जाते. बऱयाचवेळा दोन ते तीन महिने वेतनच दिले जात नाही. याचबरोबर वेतनामधील काही रक्कमही हडप करण्यात येते, अशा तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे या कर्मचाऱयांनी गेल्या दोन दिवसांपासून आंदोलन सुरू केले होते.
शुक्रवारपासून कचऱयाची उचल करण्याचे काम थांबविण्यात आले. दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले होते. मात्र आता मुख्यमंत्र्यांनी ठोस आश्वासन दिल्यामुळे बेळगावमधील सफाई कर्मचाऱयांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे. शनिवारीही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्मचारी जमले होते. मात्र स्वच्छता कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक वाघेला यांनी बेंगळूर येथील संघटनेच्या पदाधिकाऱयांचा मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीचा तपशील सांगितला. त्यानंतर तातडीने आंदोलन मागे घेण्याची विनंती संघटनेच्या पदाधिकाऱयांनी केली. येत्या तीन महिन्यांमध्ये या सर्व समस्या सोडविण्याचे ठोस आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे कामाला सुरुवात करा, असे आवाहन त्यांनी केले आहे. यावेळी विजय निरगट्टी, षण्मुख आदीआंद्र, मालती सक्सेना, बळ्ळारी, मुनीस्वामी भंडारी व कर्मचारी उपस्थित होते.
सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार सफाई कर्मचाऱयांची बाजू पत्रकार तसेच इतर माध्यमांनी उचलून धरली. त्यामुळे आम्हाला न्याय मिळाला. आमच्या आंदोलनाला साऱयांनीच पाठिंबा दिला. काही ठिकाणी कचऱयाचे ढिग होते. मात्र आंदोलन असल्यामुळे कोणीही तक्रार केली नाही. सर्वांनी दिलेल्या सहकार्याबद्दल दीपक वाघेला, विजय नरगट्टी, षण्मुख आदीआंद्र यांनी आभार मानले.









