माजी सरपंच प्रवीण ब्लेगन यांचा दावा : मतदारांकडे दुर्लक्ष, प्रतारण, खोटी आश्वासने महाग पडणार
प्रतिनिधी / पणजी
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची अकार्यक्षमता, स्वतःच्या मतदारांकडे केलेले दुर्लक्ष, प्रतारणा, खोटी आश्वासने, यासारखी अनेक कारणे येत्या निवडणुकीत त्यांना घरी बसविण्यास पुरेशी ठरणार आहेत, असा दावा सांखळीचे माजी सरपंच प्रवीण ब्लेगन यांनी केला. त्याशिवाय सांखळीने आजपर्यंत कोणत्याही आमदारास तिसऱयांदा संधी दिलेली नाही. ही परंपराही सांखळीकर अबाधित ठेवणार आहेत, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
गत सुमारे 31 वर्षांपासून राजकारणात सक्रीय असलेले व पूर्वीच्या सांखळी, हरवळे, विर्डी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच श्री. ब्लेगन शुक्रवारी पणजीत पत्रकारांशी बोलत होते. सांखळीतील एकूण मतदारसंख्येच्या 35 टक्के मतदार सांखळी शहर आणि पालिका परिसरात येतात. त्यामुळे कोणत्याही उमेदवाराचे भवितव्य हे सांखळीकरच ठरवतात. गत 31 वर्षांपासून सांखळीत काँग्रेसचा प्रभाव अबाधित आहे, याचा आपण साक्षिदार आहे. मतदारसंघाच्या अन्य भागात खास करून ग्रामीण परिसरात तो कमी जास्त प्रमाणात आहे. अशावेळी सांखळीतील लोक एकत्र येऊन एकसंघ राहिल्यास डॉ. सावंत यांना हरविणे सहज शक्य आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
2012 मध्ये काँग्रेस विरोधी लाट होती. मात्र ती भाजपच्या समर्थनात नव्हती. त्या लाटेचा भाजपला फायदा झाला व प्रमोद सावंत मोठय़ा मताधिक्क्याने विजयी झाले. त्यावेळी त्यांना 14 हजार मते मिळाली होती. परंतु त्यानंतर 2017 च्या निवडणुकीत त्यांची लोकप्रियता खालावली व केवळ 10 हजार मतांनी ते विजयी झाले. येत्या 2022 च्या निवडणुकीत त्यांचा पराभव नक्की आहे याची खात्री केवळ आपण नव्हे तर संपूर्ण सांखळी मतदारसंघातील लोकांना आहे, असे त्यांनी सांगितले.
डॉ. सावंत यांनी विजयाची स्वप्ने पाहू नये
पाळी (आता सांखळी) मतदारसंघाची एक अनोखी परंपरा आहे. या मतदारसंघात आतापर्यंत कोणताही आमदार तिसऱयांदा विजयी झालेला नाही. डॉ. सुरेश आमोणकर आणि डॉ. सावंत हे दोनच आमदार दुसऱयांदा विजयी झाले. अन्यथा या मतदारसंघात कुणालाच दुसऱयांदाही संधी मिळालेली नाही. त्यामुळे प्रमोद सावंत यांनी तिसऱयांदा विजयी होण्याची स्वप्ने पाहू नये. सांखळीतील मतदार त्यांना ती संधी देणार नाहीत, हेच त्यांची आतापर्यंतची वाटचाल, वागणूक, मतदारांकडे केलेली प्रतारणा यातून दिसून येत आहे, असे ब्लेगन म्हणाले.
निवडणूक जाहीर होताच लोक बोलू लागतील
सांखळीतील लोक सध्या गप्प आहेत कारण डॉ. सावंत मुख्यमंत्र्याच्या खुर्चीत आहेत. एखाद्याने विरोधात बोलल्यास ते सत्तेचा आणि पोलीस बळाचा वापर करून त्याला अडचणीत आणू शकतात, सतावणूक, छळणूक करू शकतात. एकदा का निवडणूक जाहीर झाली, म्हणजे लोक त्यांच्या दराऱयातून मुक्त होतील व उघडपणे बोलण्यास, त्यांच्या विरोधात प्रचार करण्यास मोकळे होतील, असे ब्लेगन म्हणाले.
आणखी एक पार्सेकर?
गोमंतकीय मतदार खूप हुशार आहेत. गत निवडणुकीत मांद्रेतील लोकांनी माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना घरचा रस्ता दाखवला. आता त्याची पुनरावृत्ती सांखळीत होणार आहे. मुख्यमंत्र्यांची अकार्यक्षमता, स्वतःच्या मतदारांकडे केलेले दुर्लक्ष त्यांना घरी बसविण्यास पुरेशी ठरणार आहे, असा दावा ब्लेगन यांनी केला.
सांखळी हा संपूर्ण मतदारसंघ पूर्णतः खाणींवर अवलंबून होता. त्याच बंद पडल्यामुळे बेकारी प्रचंड वाढली आहे. सध्या खाणी बंद असल्या तरीही काही प्रमाणात खनिज वाहतूक चालू आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 31 जानेवारीनंतर ही वाहतूक बेकायदेशीर ठरलेली आहे. आम्ही ती रोखू शकलो असतो. परंतु थोडय़ातरी ट्रकांना काम आणि लोकांना रोजीरोटी मिळत असेल तर मिळू दे या विचाराने आम्ही आजही गप्प आहोत. अन्यथा लोकांवर उपाशीपोटी राहण्याची वेळ येणार आहे.
मुख्यमंत्रीपदी असुनही मतदारांसाठी काहीच नाही
अशावेळी मुख्यमंत्रीसारख्या सर्वोच्च पदी असलेले प्रमोद सावंत आपल्या मतदारांसाठी खूप काही करू शकले असते. परंतु त्यांच्याकडे स्वतःच्या मतदारांसाठी वेळच नाही. खाणी सुरू करण्याच्या आश्वासनापलीकडे त्यांनी लोकांना आणखी काहीच दिलेले नाही. हाच दुर्लक्षितपणा येत्या निवडणुकीत त्यांना महागात पडणार आहे, असेही ब्लेगन म्हणाले.









