पुढील विधानसभेत भाजपलाच बहुतम मिळाणार : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना आत्मविश्वास : संपादकांशी अनौपचारीक गाप्पा गोष्टी
प्रतिनिधी / पणजी
गेल्या अडीज वर्षात आपण व आपले सरकार विविध संकटांशी झुंज देत राहिले. अशा परिस्थितीतूनही आज राज्याची आर्थिक परिस्थिती मजबूत ठेवण्यात यश आल्याचा पुनरुच्चार करित ‘स्वयंपूर्ण गोवा’ या आपण तयार केलेल्या योजनेने आपल्याला मुख्यमंत्रीपदावर राहून सर्वात जास्त समाधान मिळाले असे सांगताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आगामी निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत मिळणार आणि आपण पुन्हा एकदा सरकार स्थापणार असा आत्मविश्वास व्यक्त केला.
राज्यातील माध्यमांच्या संपादकांशी अनौपचारिकपणे गप्पा गोष्टी करताना मुख्यमंत्र्यांनी ऑफ-द-रेकॉर्डवर अनेक गोष्टी सांगितल्या. आपले बरे वाईट सर्व अनुभव सांगितले. आम्ही ज्या परिस्थितीशी, संकटांशी तोंड देत राहिलो ती परिस्थितीच भयानक होती. जनतेची जोरदार टीकाही सहन केली परंतु जनतेने आम्हाला साथही दिली व ही साथ अशीच पुढे चालू राहाणार. आम्ही सध्या जी तयारी चालविली आहे ती पाहता आम्ही पूर्ण बहुमतांनिशी पुन्हा सत्तेवर येऊ. सध्या अनेकजण ज्या इकडून तिकडे उडय़ा मारीत आहेत त्यांचे लक्ष विचलित झालेले आहे. तृणमूल काँग्रेसने गोव्यात प्रवेश केला खरे परंतु, त्यांच्या हाती फारसे काही लागेल असे वाटत नाही. या पक्षाने गोव्यात सर्वत्र जोरदार तयारी केलेली आहे. काँग्रेसच्या तुलनेत तृणमूलने आपली सारी शक्तीपणाला लावलेली आहे. पण खरे सांगतो तृणमूलचा भाजपशी काहीही संबंध नाही. फक्त आम्हाला भीती वाटते की गोव्यामध्ये बंगालहून मोठय़ा प्रमाणात माणसे येत आहेत व ते काहीही करतील, मुख्यमंत्री म्हणाले.
निवडणुका वेळेतच व्हाव्या
राज्यात कोविड बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय हा आपल्याला चिंतेचा विषय वाटतोय. तथापि, बाधित वाढले असले तरी इस्पितळात दाखल होणाऱयांचे प्रमाण अत्यल्प आहे. तिसरी लाट आता ओमेक्रॉनद्वारे सर्वत्र पसरले आहे. आम्ही मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. दि. 3 जानेवारी रोजी आपण महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली आहे. त्यात महत्त्वाचा निर्णय होईल. गरज पडल्यास रात्रीच्यावेळी संचारबंदी लागू करावी लागेल. मुख्यमंत्री म्हणाले, ओमेक्रॉन हा फार गंभीर व जीवघेणा नाही. तरीदेखील आम्ही काळजी घेणे आवश्यक आहे. कोविडच्या तिसऱया लाटेचा विपरित परिणाम होऊ नये या करिता शाळा, महाविद्यालये पुन्हा सुरु करता येतील की नाही याबाबत देखील निर्णय घेण्याची पाळी येऊ शकते, मुख्यमंत्री म्हणाले.
वाढत्या कोविड बाधितांमुळे निवडणुका पुढे ढकलल्या जाऊ नयेत. आपल्याला तर जितक्या लवकर होतील तेवढा लाभ होईल व निवडणुका घेणे किंवा पुढे ढकलणे हा निर्णय निवडणूक आयोगाचा राहील, असे मुख्यमंत्री म्हणाले. शक्यतो निवडणुका वेळेवर झाल्या पाहिजेत या मताचा आपण असल्याचेही ते म्हणाले. अलिकडे काही नेते समाजकारण विसरतात. राजकारणात प्रवेश करताना समाजकारण हा मुख्य उद्देश असावा. आपण मुख्यमंत्री झालो तो देखील समाजकारणातून. खूप लहानपणी आपण एका सामाजिक संस्थेचा अध्यक्ष बनलो व समाजसेवा जी सुरु ठेवली ती अद्याप चालूच आहे. त्या माध्यमातून जनतेशी जोडलो गेलो व राजकारणात पोहोचलो आणि आमदार, सभापती व मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचलोय. नव्याने राजकारणात प्रवेश करतेवेळी त्याचे भान ठेवावे व समाजकारणातूनच पुढे राजकारणात पोहोचणाऱयांना जनतेच्या समस्या, जनतेचे दुःख जाणून घेणे शक्य होते, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
आपल्या पक्षात मोठय़ा प्रमाणात राजकीय भरती होत आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटते? या प्रश्नाला त्यांनी उत्तर देतानाच बगल दिली. भाजप गोव्यात चांगले काम करतोय. आज सत्तेवर आहे, उद्या पुन्हा सत्तेवर येणार याची सर्वांनाच खात्री आहे. ज्यांना पक्षात यायचे आहे त्यांना आवश्य येऊ द्या. आम्ही कोणाला अडविणार नाही नाही. आलेक्स रेजिनाल्ड हे काँग्रेसमध्ये होते ते योग्य होते. आता त्यांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतलेला आहे. ते माझे मित्र आहेत. तृणमूलमध्ये जाण्यापूर्वी आपल्याला भेटले नाहीत. मात्र तृणमूलमध्ये प्रवेश करुन झाल्यानंतर ते आपल्याला भेटले. तुम्ही चुकीचा निर्णय घेतला असे आपण त्यांना सांगितले. मायकल लोबो हे जर भाजप सोडून जाणार असतील तर ते अत्यंत चुकीचा निर्णय घेत आहेत. ते स्वतःसाठीच राजकीय अडचण निर्माण करुन घेतील. कळंगुटची जनता भाजपच्या पाठीशी ठाम उभी आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
सांखळी मतदारसंघात परकियांपेक्षा स्वकियांचा धोका आपल्याला आहे का? असे विचारता सांखळी मतदारसंघातील जनता कोणाच्या ‘मोकाशा’मध्ये राहात नाही असे मार्मिक उत्तर देत मुख्यमंत्री जोरदार हसले. सांखळीतील नागरिक भाजपशिवाय अन्य कोणत्याही पक्षाचा विचार देखील करणार नाही, असेही उत्तर त्यांनी दिले. जनतेने संपूर्ण गोव्यात मतदान करताना विचारपूर्वक मतदान करावे. भाजपने गेल्या 10 वर्षात केलेल्या विकासाची तुलना अन्य कोणत्याही सरकारशी होऊच शकत नाही. म्हणूनच तर स्वयंपूर्ण मित्र योजनेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात कौतुक केले. आमच्या कार्याचे चीज झाले. आता हवा जनतेचा आशीर्वाद, मुख्यमंत्री उत्तरले.









