५ डिसेंबरला राज्यव्यापी बंदची हाक
बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी शनिवारी कन्नड समर्थक गटांना इशारा दिला असून त्यांना ५ डिसेंबरचा राज्यव्यापी बंद मागे घेण्यास सांगितले आहे. कन्नड समर्थक गटांनी मराठा विकास महामंडळाच्या स्थापनेविरोधात ५ डिसेंबर रोजी कर्नाटक बंदची हाक दिली आहे. सरकारने हा निर्णय मागे घेण्यासाठी कन्नड संघटनांनी ३० नोव्हेंबरची मुदत दिली आहे.
येडियुरप्पा यांनी पत्रकारांशी बोलताना मी कन्नड आणि कन्नडिगांसाठी आहे. त्यांच्या विकासासाठी जे आवश्यक आहे ते करण्यास मी तयार आहे. परंतु बंदची हाक देणे योग्य नाही. लोक त्याचे कौतुक करणार नाहीत. मी कुठल्याही सक्तीने बंदला परवानगी देणार नाही, असे ते म्हणाले.
निषेध करण्यासाठी जर पुतळे जाळले तर आम्हाला कठोर कारवाई करावी लागेल. निषेध करायचा झाल्यास शांततेत करा, परंतु त्याला वेगळे वळण देण्याच्या प्रयत्न झाल्यास सरकार सहन करणार नाही. तसेच येडियुरप्पा यांनी कन्नड समर्थक गटांना सहकार्याचे आवाहन केले आहे.
आमचे सरकार प्रामाणिकपणे समाजातील सर्व घटकांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करीत आहे. आम्ही भेदभाव करीत नाही. त्यांनी हे समजून घ्यावे आणि त्यांचा बंद मागे घ्यावा. मी त्यांना हात जोडून विनंती करतो, असे येडियुरप्पा म्हणाले.