प्रतिनिधी /बेंगळूर
मुख्यमंत्री बनण्याची आपल्याला घाई नाही. काँग्रेस पक्षाला सत्तेवर आणणे हेच आपले ध्येय असल्याचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी सांगितले आहे. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांच्यात भावी मुख्यमंत्री बनण्यावरून चढाओढ सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असल्याने त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
डी. के. शिवकुमार यांना अधिकारासाठी अद्याप भरपूर कालावधी बाकी आहे. त्यामुळे 2023 मध्ये सिद्धरामय्याच मुख्यमंत्री व्हावेत, असे वक्तव्य काँग्रेसचे आमदार रामप्पा यांनी केले होते. यावर प्रतिक्रिया देताना शिवकुमार यांनी, आपण मुख्यमंत्रिपदाची घाई असल्याचे कोठे सांगितले आहे का, असा परखड प्रश्न उपस्थित केला. तसेच भाजपमधील समस्या आणि काँग्रेस पक्षातील स्थितीमध्ये बराच फरक आहे. आपल्या पक्षात कोणतीही खुर्ची रिकामी नाही. सध्या आपली शर्यत भाजपला पायउतार करून काँग्रेसला सत्तेवर आणण्याची आहे, असेही ते म्हणाले.









