प्रतिनिधी/ निपाणी
गेल्या काही दिवसांपासून कर्नाटक राज्यात ड्रग्ज विक्री प्रकरणाची पाळेमुळे खोलवर रुतल्याचे दिसून आले. त्याचा छडा लावण्याच्या उद्देशाने कर्नाटक पोलिसांनी राज्यभर धडक मोहीम राबविली आहे. त्याचाच एक भाग म्हणून निपाणीसह बेळगाव जिल्हय़ातही विविध ठिकाणी गांजा विक्री करणाऱया टोळय़ा पकडल्या आहेत. मात्र शुक्रवारी निपाणी पोलिसांनी सीमाभागात गांजा विक्री करणाऱया मुख्य सुत्रधाराच्या मुसक्या आवळल्या. आप्पा उर्फ ईस्माईल गुलाब किल्लेदार (वय 45, रा. चिखली ता. कागल) असे अटक केलेल्या गांजा विक्रेत्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, ईस्माईल हा गेल्या अनेक दिवसांपासून निपाणी परिसरात गांजा विक्री करत होता. चिखलीहून कोडणीमार्गे निपाणी शहर व परिसरात गांजा पुरवठा केला जात होता. दरम्यान शुक्रवारी कोडणी हद्दीतील नाजूकनगर येथे सार्वजनिकस्थळी गांजा विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सीपीआय संतोष सत्यनायक यांच्या नेतृत्त्वाखाली निपाणी ग्रामीण पोलिसांनी सापळा रचून आप्पा किल्लेदार याला रंगेहाथ पकडले. त्याच्यावर मादक पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. यानंतर न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली.
सदर कारवाई जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख अमरनाथ रेड्डी, डीएसपी मनोजकुमार नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सीपीआय संतोष सत्यनायक यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीणचे पीएसआय बी. एस. तळवार, हवालदार श्रीशैल गळतगी, यल्लाप्पा करेन्नवर, सिद्धारुढ खोत आदींनी केली. ट
तीन तालुक्यात गांजा विक्री
गांजा विक्री प्रकरणी रंगेहाथ पकडलेला आप्पा हा गेल्या अनेक महिन्यापासून निपाणी, चिकोडी, हुक्केरी या तालुक्यांमध्ये गांजा विक्री करत होता. याप्रकरणी त्याच्यावर निपाणी, संकेश्वर व हुक्केरी आदी पोलीस स्थानकांमध्ये पाच गुन्हे दाखल होते. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून तो पोलिसांच्या रडारवर होता. अखेर शुक्रवारी निपाणी पोलिसांनी त्याला बेडय़ा ठोकल्या.









