अंबानी कुटुंब लंडनमध्ये स्थायिक होण्याचे वृत्त फेटाळले
वृत्तसंस्था / लंडन
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि आशियाचे सर्वात धनाढय़ उद्योजक मुकेश अंबानी यांनी लंडनच्या स्टोक पार्कमध्ये 592 कोटी रुपये खर्चुन 300 एकर जमिनीची खरेदी केली आहे. या रिजॉर्टमध्ये 49 बेडरुम्स आहेत. अंबानी तेथेच राहणार असल्याचे वृत्त यापूर्वी प्रसारित झाले होते. पण काही काळानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजने ते फेटाळले आहे.
मुकेश अंबानी किंवा त्यांच्या कुटुंबातील कुठलाच सदस्य लंडनमध्ये स्थायिक होणार नाही. लंडन किंवा जगातील कुठल्याही अन्य हिस्स्यात स्थायिक होण्याची त्यांनी योजना आखली नसल्याचे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडकडून सांगण्यात आले.
रिलायन्स समुहाची कंपनी आरआयआयएचएलने स्टोक पार्कमध्ये मालमत्ता खरेदी केली आहे. या हेरिटेज मालमत्तेचा वापर गोल्फिंग आणि अन्य क्रीडाप्रकारांसाठी केला जाईल. याकरता स्थानिक नियम आणि दिशानिर्देशांचे पालन करण्यात येणार आहे. ही मालमत्ता वेगाने वाढता ग्राहक व्यवसाय पाहता अधिग्रहित करण्यात आली आहे. भारताच्या संस्कृतीला आम्ही जागतिक स्तरावरील ओळख मिळवून देऊ इच्छितो असे कंपनीकडून म्हटले गेले.
कोरोना संकटात जाणीव
महामारीमध्ये लॉकडाउनदरम्यान या कुटुंबाला अन्य निवासस्थानाची गरज जाणवली होती. पण मुकेश अंबानी यांच्याकडे मुंबईत 4 लाख चौरस फुटांचे एंटीलिना नावाचे आलिशान निवासस्थान आहे. लॉकडाउनदरम्यान अंबानी कुटुंबाने गुजरातच्या जामनगरमध्ये वास्तव्य केले होते. तेथे कंपनीचा तेलशुद्धीकरण प्रकल्प असून तो जगातील सर्वात मोठा प्रकल्प आहे.
दिवाळी नव्या घरात
सर्वसाधारणपणे भारतीय स्वतःच्या घरात दिवाळीचा सण साजरा करतात. पण अंबानी कुटुंबीयांनी यंदाची दिवाळी लंडनच्या नव्या घरात साजरी केली आहे. दोन-अडीच महिन्यांपासून अंबानी कुटुंब मुंबईबाहेर आहे.
900 वर्षे जुना आलिशान महाल
लंडनमधील या 300 एकर जमिनीतच प्रसिद्ध स्टोक पार्क हॉटेल आहे. बकिंघमशायर भागातील ही मालमत्ता सध्या विकसित केली जात आहे. स्टोक पार्क लंडनपासून 35 मिनिटांच्या अंतरावर आहे. लंडनच्या हीथ्रो विमानतळापासून 7 मैलाच्या अंतरावर आहे. 300 एकरमधील या मालमत्तेत 27 गोल्फ कोर्स आणि स्पा आहे. 13 टेनिस कोर्ट आणि आधुनिक जिम आहे. 900 वर्षे जुना हा आलिशान महाल 1908 पर्यंत एक खासगी निवासस्थान होते. यात लक्झरी बेडरुम आणि सुइट्स आहेत. 14 एकरांचे खासगी उद्यान असून 20 हून हॉल आहेत.









