सायबर हल्ल्याचा संशय – ’न्यूयॉर्क टाईम्स’चा धक्कादायक दावा
न्यूयॉर्क/ वृत्तसंस्था
ऑक्टोबर 2020 मध्ये मुंबईसह उपनगरात वीज अचानक गेल्याने सर्वत्र काळोख पसरला होता. या घटनेमागे चीनचा हात असल्याचा दावा आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र ‘न्यूयॉर्क टाईम्स’ने केला आहे. चीनने सायबर हल्ला करून संपूर्ण देशात मालवेयर पसरवल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे.
अमेरिकेहून प्रसिद्ध होणाऱया न्यूयॉर्क टाईम्समध्ये नुकताच एक लेख प्रसिद्ध झाला आहे. या लेखात भारत आणि चीनमध्ये गलवान खोऱयात झालेल्या संघर्षाबरोबरच मुंबईत ऑक्टोबर 2020 मध्ये झालेल्या ‘ब्लॅकआऊट’संदर्भातही भाष्य करण्यात आले आहे. मुंबईतील ब्लॅकआऊट हा चीनच्या सायबर हल्ल्याचा एक कट असू शकतो. जर भारताने चीनसोबत नरमाईची भूमिका घेतली नाही तर संपूर्ण देशातील वीज घालवण्याचा इशारा या सायबर हल्ल्यातून दिला होता. चीनचे मालवेअर भारताच्या वीजपुरवठा यंत्रणेत शिरले होते. त्यात उच्च दाबाची केंद्रे आणि औष्णिक प्रकल्पांचाही समावेश होता, असा उल्लेख करण्यात आला आहे. भारतामधील वीजपुरवठा सुरळीत चालवण्यासाठी ज्या सॉफ्टवेअर आणि सिस्टीमचा वापर केला जातो त्यामध्ये चीनमधील हॅकर्सनी मालवेअर इंजेक्ट केला होता. 12 ऑक्टोबर रोजी वीजपुरवठा खंडित झाल्याने मुंबईतील अनेक भागांमध्ये बरेच तास ‘बत्ती गुल’ झाली होती.
भारताकडून तपास जारी
न्यूयॉर्क टाईम्सच्या या वृत्ताला भारतातील काही अधिकाऱयांनी दुजोरा दिला आहे. भारताच्या वीज व्यवस्थेवर चीनने सायबर हल्ला केल्याचे त्यांनी मान्य केले होते. याबाबत तपास सुरू असून त्याचा अहवाल लवकरच सादर होईल. पण अधिकाऱयांनी कोडबद्दल बोलण्यास नकार दिला. भारताकडून त्या कोडचा शोध सुरू आहे. या कोडमुळेच हा हल्ला चीनने केला की नाही हे सिद्ध होईल, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. यापूर्वी नोव्हेंबर महिन्यामध्येही महाराष्ट्र पोलिसांच्या साबयर विभागाच्या हवाल्याने या ब्लॅकआऊटमागे सायबर हल्ल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.









