ऑनलाईन टीम / मुंबई :
संपूर्ण मुंबईमध्ये 22 आणि 23 डिसेंबर रोजी पाणी कपात होणार आहे. घाटकोपर आणि कुर्ल्यातील काही भागांत पाणीपुरवठा हा पूर्णपणे बंदच ठेवण्यात येणार आहे. दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकरांना पाणी जपुन वापरण्याचे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.
दरम्यान, येत्या 22 आणि 23 डिसेंबरला संपूर्ण मुंबईत 15 टक्के पाणीकपात करण्यात येणार असल्याचे महापालिका जल अभियंता विभागाने जाहीर केलं आहे. घाटकोपर आणि कुर्ल्यातील काही भागांत पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहणार आहे. येवई येथील क्लोरिन इंजेक्शन पॉईंटची दुरुस्ती तसेच घाटकोपर उच्चस्तर जलाशय येथे मुख्य जलवाहिनीवरील झडप बदलण्याच्या कामामुळे 22 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते 23 डिसेंबर रोजी सकाळी 10 दरम्यान 24 तासांसाठी मुंबईत 15 टक्के पाणीकपात केली जाणार आहे.
मुंबई महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या 2750 मिलीमीटर व्यासाच्या उर्ध्व वैतरणा जलवाहिनीवर आग्रा रोड व्हॉल्व संकुल (ARVC) ते पोगावदरम्यान येवई येथील क्लोरिन इंजेक्शन पॉईटच्या दुरुस्तीचे काम 22 डिसेंबर रोजी हाती घेण्यात येणार आहे. या दुरुस्ती कामामुळे मुंबईच्या पाणीपुरवठ्यामध्ये 22 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून 23 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत 24 तासांच्या कालावधीत 15 टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.
तसेच 22 डिसेंबर रोजी एन विभागामध्ये घाटकोपर उच्चस्तर जलाशय येथे कप्पा 1 ला पाणीपुरवठा करणाऱ्या 1400 मिलीमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवरील 1400 मिलीमीटर व्यासाची झडप बदलण्याचे काम नियोजित आहे.
हे काम मंगळवार, 22 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून बुधवार, 23 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे खालील नमूद भागांमध्ये मंगळवार, 22 डिसेंबर रोजी पाणीपुरवठ्यामध्ये 15 टक्के कपात करण्यात येईल.









