मडगाव
वास्कोच्या टिळक मैदानावर आज शनिवारी मुंबई सिटी एफसी आणि नॉर्थईस्ट युनायटेड एफसी यांच्यात आयएसएल फुटबॉल स्पर्धेतील लढत होणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता प्रकाशझोतात हा सामना होईल.
गेल्यावर्षी नॉर्थईस्ट युनायटेड एफसीची कामगिरी खराब झाली होती आणि त्याना नवव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. यंदा नॉर्थईस्ट युनायटेड एफसीच्या संघ व्यवस्थापनाने संघात मोठे बदल केले असून तब्बल 19 नव्या खेळाडूंना करारबद्ध केले आहे. दर्जेदार विदेशी फुटबॉलपटूसह प्रतिभावंत युवा देशी फुटबॉलपटूंना यंदा नॉर्थईस्ट युनायटेड एफसीने संघात स्थान दिले असून स्पर्धेची प्ले-ऑफ फेरी गाठणे हे त्यांचे पहिले उद्दिष्ठय़ असेल. यंदा आम्ही मोठय़ा तयारीने उतरलो असल्याचे त्यांचे प्रशिक्षक जॅरार्ड नूस यांनी म्हटलं आहे.
स्पर्धेच्या सहा वर्षांच्या इतिहासात नॉर्थईस्ट युनायटेडला केवळ एकदाच बाद फेरी गाठता आली आहे. मागील मोसमापासून त्यांची कामगिरी निराशजनक झाली आहे. 14 सामन्यांत त्यांना एकही विजय मिळविता आलेला नाही. सहा बरोबरी आणि आठ पराभव अशी त्यांची कामगिरी आहे. अशावेळी नवा मोसम आणि पहिली लढत सोपी नसेल. ‘आम्हाला मुंबईच्या बलस्थानांची कल्पना आहे. आम्हाला आमच्या खेळाकडे जास्त लक्ष दय़ावे लागेल आणि एकावेळी एका सामन्याचा विचार करावा लागेल, असे नॉर्थईस्ट युनायटेडचे प्रशिक्षक जेरार्ड नूस म्हणाले.
दुसरीकडे पहिल्या जेतेपदासाठी सातत्याने सक्षम मोहिम राबविण्यास सज्ज असल्याचे दाखविण्यास मुंबई सिटी प्रयत्नशील असेल. गेल्या तीन मोसमांमध्ये एफसी गोवाच्या घोडदौडीचे शिल्पकार ठरलेले सर्जिओ लॉबेरा हे त्यांचे आता मुख्य प्रशिक्षक आणि मार्गदर्शक आहेत. ‘हा सामना खडतर असेल. यंदाचा मोसम सर्वाधिक चुरशीचा असेल, कारण बरेच संघ चांगले आहेत. मी आमच्या खेळाडूंच्या साथीत कसून तयारी करीत आहे.









