विजयी संघाचे प्लेऑफमधील स्थान निश्चित होणार
वृत्तसंस्था/ अबु धाबी
मुंबई इंडियन्स व आरसीबी यांच्यात बुधवारी आयपीएलमधील लढत होणार असून प्लेऑफमधील स्थान निश्चित करणे हेच दोन्ही संघांचे ध्येय असणार आहे. मुंबई इंडियन्सचा नियमित कर्णधार रोहित शर्मा या सामन्यातही खेळण्याची शक्यता कमी आहे. सायंकाळी 7.30 पासून या सामन्याला सुरुवात होईल.
याआधीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सला राजस्थान रॉयल्सकडून 8 गडय़ांनी पराभव स्वीकारावा लागला असला तरी गुणतक्त्यात त्यांनी आघाडीचे स्थान राखले आहे. त्यांचे 11 सामन्यात 14 गुण झाले आहेत. रविवारी चेन्नई सुपरकिंग्सविरुद्ध पराभूत झाल्यानंतर विराट कोहलीच्या आरसीबीचेही 14 गुण झाले आहेत. पण मुंबईची धावगती सरस आहे. बुधवारचा सामना जिंकणाऱया संघाचे प्लेऑफमधील स्थान निश्चित होणार आहे. धोंडशिरेच्या दुखापतीमुळे मागील दोन सामन्यात सहभागी होऊ न शकलेला रोहित शर्मा सोमवारी नेटमधील सरावात सामील झाला होता. याच दिवशी ऑस्ट्रेलिया दौऱयासाठी भारतीय संघाची निवड जाहीर करण्यात आली आणि त्यात रेहित शर्माचा समावेश करण्यात आला नव्हता.

त्याच्या फिटनेसबाबत मुंबई इंडियन्स किंवा बीसीसीआय यापैकी कोणीही स्पष्टीकरण केलेले नाही. तो संघात नसल्यामुळे सौरभ तिवारी व इशान किशन यांना आणखी एक सामना खेळण्याची संधी मिळणार आहे. इशानने काही सामन्यात तडाखेबंद फलंदाजी केली आहे. या मोसमात सातत्यपूर्ण कामगिरी करणारा क्विन्टॉन डी कॉक (374 धावा) राजस्थान रॉयल्सविरुद्ध मात्र अपयशी ठरला. त्याची भरपाई करण्यासाठी तोही उत्सुक झाला आहे. इशान किशन (298) व सूर्यकुमार यादव (283) यांचा सर्वाधिक धावा जमविणाऱयांत समावेश असून ते कोणत्याही आक्रमणावर हल्ला करू शकतात. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पंडय़ाने षटकारांची आतषबाजी करण्याची क्षमता दाखवून देताना सात षटकार ठोकले होते. हंगामी कर्णधार पोलार्ड (214) व कृणाल पंडय़ा (85) यांच्यासमवेत हार्दिक कोणत्याही आक्रमणाच्या चिंधडय़ा उडवू शकतो. स्फोटक फलंदाजी करण्याची या तिघांत असलेली क्षमता हा दोन संघांतील फरक निर्णायक ठरू शकतो. राजस्थानविरुद्ध झालेल्या आधीच्या सामन्यात मुंबईच्या गोलंदाजांना बेन स्टोक्स व संजू सॅमसन यांनी झोडपले होते. पण ते विसरून आता नव्या जोमाने आरसीबीविरुद्ध ते मैदानात उतरतील. बोल्ट व बुमराह सुरुवातीला व अखेरच्या हाणामारीच्या षटकांवेळी घातक ठरले आहेत. दोघांनी मिळून आतापर्यंत 33 बळी टिपले आहेत. तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून ते जेम्स पॅटिन्सन किंवा नाथन कोल्टर नाईल यापैकी एकाला निवडण्याची शक्यता आहे.
आरसीबीसाठी कोहली (415 धावा) आपला जबरदस्त फॉर्म पुढे चालू ठेवण्यास उत्सुक असेल. ऍरोन फिंच (236), देवदत्त पडिक्कल (343) व डी व्हिलियर्स (324) यांना अधिक सातत्य दाखवून कर्णधाराला साथ देण्याची गरज आहे. टी-20 मधील सर्वोत्तम फलंदाज का मानले जाते, हे डी व्हिलियर्सने वारंवार दाखवून दिलेले आहे. आरसीबीची आघाडी फळी एकत्रित चमकली तर ते मुंबईच्या आक्रमणाला सुमार ठरवू शकतील. ख्रिस मॉरिस, मोईन अली, गुरकीरत मान खालच्या क्रमांकावर उपयुक्त फटकेबाजी करून जलद धावा जोडू शकतात. वेगवान गोलंदाज नवदीप सैनीची दुखापत ही मात्र त्यांच्यासाठी चिंतेची बाब बनली आहे. त्याच्या हाताला दुखापत झाली असून त्याच्या उपलब्धतेबाबत काहीही स्पष्ट करण्यात आलेले नाही. तो न खेळल्यास मॉरिस, सिराज व इसुरू यांनाच गोलंदाजीचा भार सांभाळावा लागणार आहे.
संघ : मुंबई इंडियन्स : पोलार्ड (कर्णधार), तरे, रोहित शर्मा, अनमोलप्रीत सिंग, अनुकुल रॉय, लीन, धवल कुलकर्णी, दिग्विजय देशमुख, हार्दिक पंडय़ा, इशान किशन, पॅटिन्सन, बुमराह, जयंत यादव, कृणाल पंडय़ा, मॅक्लेनाघन, मोहसिन खान, कोल्टर नाईल, प्रिन्स बलवंत राय, डॉ कॉक, राहुल चहर, सौरभ तिवारी, रुदरफोर्ड, सूर्यकुमार यादव, बोल्ट.
आरसीबी : कोहली (कर्णधार), डीव्हिलियर्स, पार्थिव पटेल, फिंच, जोश फिलिप, ख्रिस मॉरिस, मोईन अली, सिराज, शाहबाज अहमद, देवदत्त पडिक्कल, यजुवेंद्र चहल, नवदीप सैनी, स्टीन, पवन नेगी, उदाना, दुबे, उमेश यादव, गुरकीरत सिंग, मान, वॉशिंग्टन सुंदर, पवन देशपांडे, ऍडम झाम्पा.
सामन्याची वेळ : सायं. 7.30 पासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स.









