मायावतीने आपल्या मायाशक्तीने शंबरासूराला मोहिले. तिच्या आजुबाजूला जे दासदासी होते त्यांनाही तिने मोहून टाकले. या सगळय़ांपासून लपवून ठेवून ती त्या बालकाचा संभाळ करू लागली. अत्यंत प्रेमाने ती त्याला वाढवत होती. त्याचबरोबर हे तिचे गुह्य इतरांना कळू नये याची काळजीही घेत होती.
थोडय़ाच दिवसा प्रौढवयसा। आंगीं बाणली यौवनदशा। रूपरेखा लावण्यठसा । जनकासरिसा निडारला ।जयाची तनु लावण्यतर। नारी पाहती ज्या सादर । त्यांचे अंतरिं स्मरविकार । दर्शनमात्रें उपजवी। लावण्यरसिक पुरुषरत्न। पाहता नारिंचें वांछी मन । यासीं रमिजे करूनि प्रयत्न । द्रवे कारण अभिलाषें। ऐसी देखोनि मन्मथवयसा। कामिनी होती साभिलाषा । असो प्रत्यक्ष रतिमानसा । विभ्रम कैसा तो ऐका ।
लवकरच प्रद्युम्नाने यौवनात पदार्पण केले. तो आपल्या पित्यासारखा अत्यंत सुंदर व आकर्षक दिसू लागला. त्याचे सुंदर शरीर पाहून स्त्रियांना त्याच्याबद्दल आकर्षण वाटू लागले. लावण्यसुंदर आणि रसिक पुरुषाला पाहून स्त्रीचे मन त्याच्याकडे धाव घेते व हा पुरुष आपला व्हावा असे तिला वाटते. हा तर प्रत्यक्ष कामदेव मदनाचाच अवतार होता. मग स्त्रियांना त्याच्याबद्दल आकर्षण वाटणे हे स्वाभाविकच नाही काय? इतर स्त्रियांचे सोडून द्या, प्रत्यक्ष रतिच्या मनात याने कोणता विभ्रम निर्माण केला? रतिच्या म्हणजेच मायावतीच्या मनात त्याच्याविषयी आकर्षण निर्माण झाले. ती कामूक अंगविक्षेप करून त्याला आवाहन करू लागली.
तेणें मन्मथ विस्मित मनीं । होऊनि तर्की अंतःकरणीं। आजि कां जननी विपरीत चिन्हीं । मजलागूनि संस्तोभी । हेंचि जाणावया प्रकट । शंका सांडूनि जाला धीट । तयेसि पुसता जाला स्पष्ट । कर्णीं सुभट तें ऐका । आपली आई असे विचित्र हावभाव का करत आहे हे प्रद्युम्नाला कळेना. शेवटी त्याने धाडसाने ही शंका प्रकट करायचे ठरवले.
भो भो जननी आजि हे मति । का संभवली तुझ्या चित्तीं । सांडूनि मातृभावाची स्थिति । वर्तसी युवती समसाम्य ।
जैसी कुलटा गणिका चेटी । तैसिया चिन्हांची परिपाटी । वर्तसी काय तुझिये पोटीं । मज ते गोठी सांगावी ।
प्रद्युम्नाने मायावतीला विचारले-हे माते! आज तुझ्या बुद्धीला काय झाले? तू माझी आई आहेस. मग मातृभाव टाकून आज एका युवतीसारखी का वागतेस? जशी कुलटा स्त्री किंवा वेश्या वागते तसे हावभाव तू का करत आहेस? ही कामवासना तुझ्या मनात कशी काय उत्पन्न झाली? तुझ्या मनात आहे तरी काय? ते सर्व मला सांग.
म्हणे भो भो जी मन्मथा । गुह्य ऐकें प्रभुसमर्था ।
मी तंव प्राचीन तुझी कान्ता । तवाधिकृता पत्नीत्वें ।
त्यावर मायावतीने त्याला सांगितले-हे प्रभो! तू माझा जन्मोजन्मीचा पती कामदेव असून मी तुझी जन्मोजन्मीची पत्नी रति आहे. मग आपले सारे गुह्य तिने प्रद्युम्नापाशी प्रकट केले.








